

उल्हासनगर, ता. १३ (बातमीदार) : अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात घडलेल्या आगीच्या घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उल्हासनगरात शासकीय मध्यवर्ती रुग्णालय व शासकीय प्रसूतिगृह या दोन्ही रुग्णालयांतील पाण्यावर आधारित अग्निशामक यंत्र बंद आहे. त्यामुळे अग्निसुरक्षा यंत्रणाच ठप्प पडल्याचा प्रकार समोर आला आहे.
मध्यवर्ती शासकीय रुग्णालयातील अग्निप्रतिबंधक यंत्रणा ही मुख्य मोटार पंप बंद असल्याने पूर्णपणे कार्यान्वित नसल्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी दररोज शेकडो रुग्णांवर उपचार केले जातात, मात्र दुर्दैवाने येथे आगीची एखादी घटना घडलीच तर कोणतीच अग्निप्रतिबंधक यंत्रणा केवळ मोटार पंप बंद असल्याने काम करणार नाही, हे वास्तव आहे. ही बाब स्वतः रुग्णालय प्रशासनाने मान्य केली असून, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी सांगितले.
आठवड्याभरापूर्वी सत्ताधारी शिवसेनेकडून हीच बंद पडलेली यंत्रणा रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी येथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला होता. परंतु त्यावेळी प्रशासनाने ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास का आणून दिली नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी सुरेश बोंबे यांनी शासकीय प्रसूतीगृहातील पाण्यावर आधारित अग्निशामक यंत्र बंद असल्याची माहिती दिली आहे. यासंदर्भात संबंधित विभागाला कळवून यंत्र दुरुस्त करून ते सुरू करण्यासाठी कळवले असल्याचे बोंबे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.