

पाणीटंचाईवरून महासभेत खडाजंगी
टँकर, बंद पंप अन् रखडलेल्या टाक्यांमुळे नगरसेवक संतप्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : घोडबंदर परिसराला कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, बंद पंप, अपुऱ्या क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या आणि रखडलेल्या जलवाहिन्यांमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. त्यातच पाण्याची उपलब्धता तपासल्याशिवाय बांधकामांना परवानग्या दिल्या जात असल्याचा आरोप सर्व पक्षीय नगरसेवकांनी महासभेत केला. तसेच पाणीप्रश्न तातडीने सोडविला नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा देत सदस्यांनी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर जोरदार टीका केली.
घोडबंदर परिसरातील पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित करत अनिता ठाकूर यांनी नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याचे सांगितले. अनेक भागांत अपुरा पाणीपुरवठा होत असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कमल चौधरी यांनी पाण्याच्या टाक्या असूनही त्यात पाणी नसल्याचा मुद्दा मांडला. पंप बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. हा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास पुढील महासभेत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला, तर नगरसेविका यज्ञा भोईर यांनी पाणीटंचाई अद्याप कायम असल्याचे सांगत प्रशासनाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप केला. नागरिकांना नियमित पाणी कधी मिळणार, असा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला, तर शहरातील विकास नियोजनावरच संजय भोईर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पाइपलाइनच्या कामांसाठी वारंवार रस्ते खोदले जात असल्याचा मुद्दा नारायण पवार यांनी उपस्थित केला. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे ठरले असतानाही त्याच ठेकेदाराला पुन्हा कामे का दिली जात आहेत, असा सवाल त्यांनी केला.
समस्या सोडविण्याचे आश्वासन
श्रीनगरमधील पाण्याच्या टाकीचा प्रश्नही महासभेत गाजला. जुनी टाकी पाडून नवीन टाकी उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली; मात्र दीड वर्ष उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही, अशी माहिती मनोज शिंदे यांनी दिली. दरम्यान, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना प्रभागनिहाय पाणीपुरवठ्याच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.