मुंबईत जरांगेंना राेखण्यास नकार

मुंबईत जरांगेंना राेखण्यास नकार
Published on

मुंबईत जरांगेंना राेखण्यास नकार

न्यायालयाचा प्रतिबंधात्मक आदेश नाहीच

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी गतवर्षी आंदाेलक मनाेज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदाेलन केले हाेते. तेव्‍हा झालेल्या गाेंधळाच्या पार्श्वभूमीवर यंदा त्यांना मुंबईत येण्यापासून रोखता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. ११) स्पष्ट केले. मागील अनुभव किंवा भीतीपोटी जरांगे यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेश देण्यास न्यायालयाने नकार देताना लाेकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार असल्याचे नमूद केले.

गेल्या वर्षी मुंबईत जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान जे घडले, त्याची या वेळीही पुनरावृत्ती होईल, या भीतीपोटी आम्ही कोणतेही आदेश देऊ शकत नाही. उपोषण किंवा आंदोलन करायचा मूलभूत अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिला आहे. त्यात सद्यःस्थितीत आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. राज्य सरकार कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यास सक्षम आहे, असे मुख्य न्या. महेशचंद्र त्रिपाठी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने स्पष्ट करून सरकार आणि जरांगे यांना नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

चर्चेने प्रश्न मिटवा!
जरांगे पाटील यांच्या मागण्यांसदर्भात राज्य सरकारने त्यांच्याशी चर्चा करावी आणि प्रश्न मिटवावा. पाटील अनेक दिवसांपासून उपोषणावर असल्याने कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी त्यांना आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत द्या, असेही न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले.

राज्य सरकार सक्षम
जरांगे यांच्या प्रकृतीवर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवली जात आहे. अद्याप जरांगे यांच्याकडून आंदोलनासंदर्भात कोणतीही परवानगी मागण्यात आलेली नाही. ते केवळ प्रसारमाध्यामांशी संवाद साधत आहेत. सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत, असे महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यास सरकार सक्षम आहे ना, अशी विचारणा न्यायालयाने केली असता साठ्ये यांनी हाेकारार्थी उत्तर दिले.

याचिकाकर्त्यांचा दावा
जरांगे हे सध्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन आठवड्यांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांनी १२ तारखेला मुंबईत येण्याची हाक दिली आहे. गेल्या वर्षी ऐन गणेशोत्सवात संपूर्ण दक्षिण मुंबईला जरांगे यांच्या हजारो आदोलकांनी वेठीस धरले होते. आदोलकांमुळे रस्ते जाम झाल्याने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. आंदोलक रस्त्यावर खेळत होते, आंघोळ करीत होते. न्या. घुगे यांचे वाहनही वाहन कोंडीत अडकले होते. त्यामुळे जरांगे यांच्यासह त्यांच्या हजारो समर्थकांच्या प्रस्तावित मुंबई मोर्चाबाबत न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी करणारी याचिका मुंबईस्थित नीलेश डहाणूकर आणि राजेश दळवी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com