५० हजारांची मागणी; पैसे मोजतानाच महसूल सहाय्यकासह शिपाई एसीबीच्या जाळ्यात

५० हजारांची मागणी; पैसे मोजतानाच महसूल सहाय्यकासह शिपाई एसीबीच्या जाळ्यात
Published on

लाचप्रकरणी दोघांना अटक
ठाणे, ता. १२ : ‘आपले सरकार’ सेवा केंद्राची आयडी ॲक्टिव्ह करण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) महसूल सहाय्यकासह शिपायाला पकडले. ही कारवाई ठाण्यातील जांभळी नाका परिसरात शुक्रवारी झाली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक गणेश बाळकृष्ण मोरे (वय ५२) आणि सेतू व नोंदणी शाखेतील शिपाई खालीद गुलाब शेख (५३) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे २०१७ पासून मिरा रोड पूर्व येथे ‘आपले सरकार’ सेवा केंद्र सुरू होते. इमारत जुनी व मोडकळीस आल्याने केंद्र रबिया टॉवर येथे स्थलांतरित करण्यात आले. या बदललेल्या पत्त्याची पोर्टलवर नोंद करून केंद्राची आयडी ॲक्टिव्ह करण्यासाठी तक्रारदाराने २३ फेब्रुवारीला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू व नोंदणी शाखेत अर्ज केला होता. हे काम करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. ११ सप्टेंबरला तक्रारदाराने ५० हजाराची रक्कम मोरे यांच्याकडे दिली. मोरे यांनी रक्कम घेऊन ती मोजण्यासाठी शेख यांच्याकडे दिली. शेख पैसे मोजतानाच एसीबीने दोघांवर कारवाई केली. याप्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस उपअधीक्षक अनिल जायकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
.........................

Marathi News Esakal
www.esakal.com