

भांडुप पोलिसांकडून एक कोटी १८ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारीसह नऊ जणांना अटक
घाटकोपर, ता. १३ (बातमीदार) : भांडुप पोलिसांनी नाहूर येथील पार्किंग व्हिलेज रोड परिसरात छापा टाकून प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी व तंबाखूजन्य पदार्थांसह पाच वाहने, असा एकूण एक कोटी १८ लाख २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत नऊ जणांना अटक करण्यात आली.
भांडुप पोलिसांना प्रतिबंधित गुटखा व सुगंधित सुपारीची वाहतूक आणि विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विनोद लाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने १२ सप्टेंबरला पहाटे सव्वाचारच्या सुमारास पार्किंग व्हिलेज रोड, नाहूर येथे सापळा रचून कारवाई केली.
या वेळी एक कंटेनर, दोन टेम्पो, एक बोलेरो आणि एक पिकअप अशा पाच वाहनांसह नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू व इतर प्रतिबंधित पदार्थ आढळून आले. या पदार्थांची किंमत २० लाख २१ हजार १०० रुपये, तर जप्त केलेल्या पाच वाहनांची किंमत सुमारे ९८ लाख रुपये आहे.
ही कारवाई पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पूर्व परिमंडळ-३ चे पोलिस उपायुक्त अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलिस आयुक्त अजय जोशी यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सपना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद लाड, पोलिस अंमलदार हिरालाल चरांडे, मुकेश तिरमारे, गणेश सोनवणे, विकास शिंदे आणि विजयकुमार पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.