मंडळांसमोर मंडपांचे विघ्न कायम

मंडळांसमोर मंडपांचे विघ्न कायम
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास उरले असताना ठाणे महापालिकेच्या परवानगी प्रक्रियेचा वेग मात्र मंदावलेला दिसत आहे. मंडप उभारणीसाठी दाखल झालेल्या ३५० अर्जांपैकी तब्बल ११४ अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे मंगलमूर्तीच्या स्वागताची तयारी करणाऱ्या मंडळांसमोर आता सजावटीपेक्षा परवानगी मिळविण्याचेच मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे माजिवडा-मानपाडा प्रभागात ६२ अर्जांपैकी तब्बल ३६ अर्ज अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ उथळसरमधील सर्व २४ आणि मुंब्य्रातील सर्व ११ अर्जही मंजूर झाले आहेत.

गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असताना मंडप, विद्युत व्यवस्था, सजावट, अग्निसुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी मंडळांची लगबग सुरू आहे, मात्र मंडप उभारण्याची अधिकृत परवानगीच मिळालेली नसल्याने अनेक मंडळांचे नियोजन अडचणीत आले आहे. १२ सप्टेंबरपर्यंत महापालिकेकडे ऑनलाइन आणि ऑफलाइन मिळून ३५० अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी २३६ अर्जांना मंजुरी देण्यात आली असून, ११४ अर्जांवर अद्याप निर्णय झालेला नाही. प्रभागनिहाय स्थिती पाहता दिवा परिसरातील चित्र विशेष चिंताजनक आहे.

परवानगी उशिरा मिळाल्यास पुढची तयारी कधी?
मंडपाची परवानगी मिळाल्यानंतरच अनेक आवश्यक बाबींची अंतिम पूर्तता करता येते. वाहतूक, अग्निसुरक्षा, विद्युत जोडणी, मंडपाची रचना आणि सजावट यांचे नियोजन त्यानंतर केले जाते. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात परवानगी मिळाल्यास मंडळांना घाईगडबडीत तयारी करावी लागण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाची तारीख निश्चित असतानाही परवानगी प्रक्रिया आधीच पूर्ण का करण्यात आली नाही, असा सवाल मंडळांकडून उपस्थित होत आहे. महापालिका प्रशासनाकडून उत्सवाच्या नियोजनासाठी बैठका आणि तयारीचे दावे केले जात असताना प्रत्यक्ष मंडप परवानग्यांच्या फाइल्स मात्र प्रलंबित असल्याचे चित्र आहे.

मंडळे परवानगीच्या प्रतीक्षेत
प्रभाग समिती अर्ज दाखल मंजुरी प्रतीक्षा
दिवा २२ ६ १६
वर्तकनगर ४९ २६ २३
माजिवडा-मानपाडा ६२ २६ ३६
लोकमान्यनगर-सावरकरनगर ४९ ३२ १७
नौपाडा-कोपरी ३९ २७ १२
वागळे ४० ३४ ६
कळवा ५४ ५० ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com