

भिवंडी, ता. १३ (वार्ताहर) : गणेशोत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यासाठी पालिका व पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील विविध भागातील १२ विसर्जन घाटांवर प्रत्येकी एक कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशभक्तांनी आपल्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे, असे आवाहन पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी केले आहे.
श्रीगणेश आगमन व विसर्जन मार्गाच्या दुरुस्तीचे नियोजन करण्यात आले आहे. डांबरीकरण करून, खडी ग्रीट पद्धतीने रस्ते दुरुस्ती करण्यात आली आहे. काही भागात पेव्हरब्लॉक लावण्यात आले आहेत. तसेच विसर्जनाकरिता आवश्यक घाट दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. कृत्रिम तलावांसाठी भाडेतत्त्वावर टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रत्येक विसर्जन घाटांवर पालिका व पोलिस कर्मचाऱ्यांचे नियंत्रण कक्ष उभारले जाणार आहेत. विसर्जन घाटांवर नागरिकांच्या सुरक्षितेसाठी अतिरिक्त विद्युत प्रकाशाची व्यवस्था करण्यात येणार आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटर व्यवस्था करण्यात आली आहे. मिरवणुकीवेळी निरीक्षणाकरिता वॉच टॉवरची व्यवस्था करण्यात येणार आहे. विसर्जन घाटावर दीड दिवसांसाठी १५५ कर्मचारी, पाच दिवसांकरिता २६४ कर्मचारी व दहा दिवसांकरिता ३०८ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आयुक्त अनमोल सागर यांनी सांगितले.
महापौर नारायण चौधरी, आयुक्त सागर, पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड, उपायुक्त विक्रम दराडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदबाने, विनोद पाटील, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे मदन भोई यांनी वऱ्हाळ तलावावरील वऱ्हाळ देवी, कामतघर व फेणे गाव विसर्जन घाट यांसह नदीनाका येथील लोकमान्य टिळक घाटावर जाऊन विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला.
१८ तराफे, ८० जीवरक्षक
प्रभाग समिती पाच अंतर्गत १२ कृत्रिम तलाव बनविण्यात आले असून, मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी १८ तराफे ठेवण्यात आलेले आहेत. मूर्तीचे विघटन जलद गतीने व्हावे, यासाठी अमोनिम बाय कार्बोनेटचा वापर करण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक विसर्जन घाटांवर निर्माल्य गोळा करण्याकरिता कलशांची व्यवस्था करण्यात येत आहे. अग्निशमन विभागामार्फत ८० जीवनरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.