महाप्रसाद, भंडाऱ्यासाठी एफडीएला सात दिवस आधी कळवा!

महाप्रसाद, भंडाऱ्यासाठी एफडीएला सात दिवस आधी कळवा!
Published on

महाप्रसाद, भंडाऱ्यासाठी एफडीएला सात दिवस आधी कळवा!
सोसायटीतील रहिवाशांसाठीच भोजनाचे आयोजन केले तरी सामूहिक अन्नवाटपाच्या कक्षेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : गणपती महाप्रसाद, भंडारा, लंगर, इफ्तार तसेच अन्य सामुदायिक अन्नवाटप कार्यक्रम आयोजित करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पूर्वसूचना देण्याचे आवाहन केले आहे.
विशेष म्हणजे सोसायटीच्या आवारात केवळ रहिवाशांसाठी भोजनाचे आयोजन केले तरी ते ‘सामूहिक अन्नवाटप’ मानले जाणार आहे. त्यानुसार कार्यक्रमाच्या किमान सात दिवस आधी संबंधित एफडीए अधिकाऱ्यांना माहिती देणे आवश्यक असल्याचे सोसायट्यांमध्ये प्रसारित झालेल्या संदेशांत नमूद करण्यात आले आहे.
एफडीएच्या एका अधिकाऱ्याने हे संदेश अधिकृत असल्याचे स्पष्ट केले. उत्सवांच्या पार्श्वभूमीवर विभागाने ३ सप्टेंबरला जारी केलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार (एसओपी) या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वसई-विरार तसेच मुंबईतील अंधेरी परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये सध्या यासंदर्भातील संदेश प्रसारित होत आहेत. त्यामध्ये कार्यक्रमाच्या सात दिवस आधी संबंधित अधिकारी किंवा अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे पत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या पत्रामध्ये कार्यक्रमाची तारीख, अपेक्षित नागरिकांची संख्या तसेच अन्न तयार करणाऱ्या केटररचे नाव आणि त्याचा एफएसएसएआय क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.

१०० ते २०० जणांना प्रसाद वाटला तरी नियम लागू
सोसायटीमध्ये १०० ते २०० रहिवाशांसाठी महाप्रसाद किंवा भोजनाचे आयोजन केले तरी त्याचा समावेश सामूहिक अन्नवाटपामध्ये होतो, असे या संदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यक्रम लहान स्वरूपाचा असला तरी अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
अंधेरी पूर्वेतील जे. बी. नगर परिसरातील अजित नगर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेडच्या समितीनेही आपल्या सोसायटीच्या व्हॉट्सॲप समूहावर याबाबतची माहिती रहिवाशांना दिली आहे.

रहिवाशांनी अन्न तयार केल्यासही नोंदणी आवश्यक
सोसायटीतील रहिवासी स्वतः अन्न तयार करणार असतील, तर ‘फूड सेफ्टी कम्प्लायन्स सिस्टीम’ पोर्टलद्वारे तात्पुरती एफएसएसएआय नोंदणी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच तेल, तूप, पनीर, किराणा माल इत्यादी साहित्य परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे आणि त्यांची बिले जतन करून ठेवावीत, असेही सूचित करण्यात आले आहे.

अन्न तयार करताना खबरदारी
अन्न तयार करणाऱ्या व्यक्तींनी टोपी, मास्क, हातमोजे आणि ॲप्रनचा वापर करावा. पिण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी आरओचे पाणी वापरावे. तयार अन्न स्टील किंवा अन्नसुरक्षित डब्यांमध्ये ठेवावे. शिळे अन्न वाटप करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमाच्या ठिकाणी ‘फूड सेफ्टी कनेक्ट’चा क्यूआर कोड प्रदर्शित करण्यासही सांगण्यात आले आहे.

दहा हजार ते एक लाख रुपयांपर्यंत दंडाचा इशारा
आवश्यक नियमांचे पालन न करता महाप्रसाद किंवा अन्य सामुदायिक अन्नवाटप केल्यास कारवाई होऊ शकते. यामध्ये १० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, असा इशारा संदेशामध्ये देण्यात आला आहे. मात्र हा दंड नेमक्या कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार आकारला जाईल आणि केवळ पूर्वसूचना न दिल्यामुळे तो लागू होईल की अन्नसुरक्षा कायद्यातील अन्य उल्लंघन सिद्ध झाल्यानंतरच कारवाई होईल, हे संबंधित एसओपी व लागू कायद्याच्या आधारे स्पष्ट होणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com