

गणेशोत्सवासाठी सज्ज झाली नवी मुंबई
१७० कृत्रिम तलावांसह महापालिकेची अभूतपूर्व तयारी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ : यंदाचा गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक व विघ्नमुक्त बनवण्यासाठी नवी मुंबई पालिकेने जय्यत तयारी केली आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियानात अव्वल स्थान पटकावणाऱ्या नवी मुंबईत महापौर सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांना ‘पर्यावरणपूरक व प्लॅस्टिकमुक्त’ गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रशासकीय प्रक्रियेचा त्रास होऊ नये, यासाठी पालिकेच्या ऑनलाइन एक खिडकी योजनेला मंडळांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. विविध विभाग कार्यालयांमधील विशेष कक्षांच्या माध्यमातून तब्बल १४० हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी घरबसल्या परवानग्या मिळवल्याने उत्सव आयोजकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुधारणेची कामे वेगाने पूर्ण करण्यात आली असून, आगमन व विसर्जन मार्गांवरील झाडांच्या फांद्यांची योग्य छाटणी करण्यात आली आहे. रस्ते दुरुस्तीसाठी विशेष पथके २४ तास कार्यान्वित ठेवली असून, पोलिस, वाहतूक पोलिस आणि एमएससीडीसीएल यांच्यात उत्तम समन्वय राखण्यात आला आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सहा फुटांपर्यंतच्या श्रीमूर्तींचे विसर्जन अनिवार्यपणे कृत्रिम तलावांमध्येच करायचे आहे. जलप्रदूषणाला पायबंद घालण्यासाठी आणि विसर्जन स्थळांवरील गर्दीचे विभाजन करण्यासाठी पालिकेने तब्बल १७० कृत्रिम विसर्जन तलाव उभारले आहेत. यामध्ये बेलापूर विभागात २२, नेरूळमध्ये २९, वाशीत १६, तुर्भे येथे २१, कोपरखैरणे व घणसोलीत प्रत्येकी १६, ऐरोलीत २५ आणि दिघा विभागात १४ गावांसह २५ अशा भव्य प्रमाणात कृत्रिम तलावांचे नियोजन केले आहे. याशिवाय नैसर्गिक तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी १४ मुख्य तलावांमध्ये जवळपास ३० टक्के भागात गॅबियन वॉलची विशिष्ट रचना करण्यात आली असून, त्यातच मूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सुरक्षेची चोख व्यवस्था
सर्व विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही, पुरेशी विद्युत यंत्रणा, जनरेटर व्यवस्था आणि व्यासपीठ उभारण्यात आले आहेत. २२ मुख्य विसर्जन स्थळांवर नागरी आरोग्य केंद्रांमार्फत वैद्यकीय पथके, प्रशिक्षित लाईफगार्ड्स, अग्निशमन दलाचे जवान तैनात राहतील. नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जनासाठी गेल्या वर्षीच्या अनुभवातून धडा घेत तराफ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.
निर्माल्याचे सुयोग्य व्यवस्थापन
उत्सवातील धार्मिक पावित्र्य जपताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी प्रत्येक विसर्जन स्थळावर सुक्या आणि ओल्या निर्माल्यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आले आहेत. निर्माल्याच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र गाड्यांची सोय असून, तुर्भे येथील प्रकल्पस्थळी निर्माल्याची सुयोग्य आणि सन्मानपूर्वक विल्हेवाट लावली जाणार आहे. स्वच्छ व सुंदर नवी मुंबईची ओळख जपत नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात कृत्रिम तलावांचा वापर करावा आणि जलस्रोत सुरक्षित ठेवून यंदाचा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.