

जुईपाड्यात अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीचा पेच
स्वच्छतागृहाचे कम्पाउंड कमी करून रस्ता रुंद करण्याची ग्रामस्थांची मागणी
जुईनगर, ता. १३ (बातमीदार) : जुईनगर सेक्टर २३ येथील जुईपाडा गावाच्या प्रवेशद्वाराजवळ पालिकेच्या स्वच्छतागृहाचे कम्पाउंड रस्त्याच्या वळणावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे कम्पाउंडची काही जागा रस्त्यासाठी उपलब्ध करून वळणाचा भाग सरळ करून रस्ता रुंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
लिज्जत पापड कंपनी परिसरातील या रस्त्यावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मात्र वळणावर कम्पाउंडची भिंत असल्याने वाहनांना वळताना अडचण येते. त्यातच भिंतीलगत दुचाकी वाहने उभी केली जात असल्याने रस्त्याची जागा आणखी कमी होते. समोरून येणाऱ्या वाहनांना मार्ग देताना कोंडी होण्याबरोबरच अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सध्या स्वच्छतागृहाची जुनी भिंत व ग्रील पाडून त्याच ठिकाणी नवीन कम्पाउंड उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे काम सुरू असतानाच कम्पाउंडची हद्द काही प्रमाणात मागे घेऊन रस्ता रुंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र, कम्पाउंडची जागा कमी करून रस्ता वाढविण्यास अधिकाऱ्यांकडून मनाई करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या समस्येबाबत मलनिस्सारण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच नेरूळ विभागाचे उपअभियंता संतोष पवार यांच्याकडे दोन महिन्यांपूर्वी लेखी विनंती करण्यात आली होती. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नसल्याचे समाजसेवक श्रीधर मढवी यांनी सांगितले.
दरम्यान, या ठिकाणी मालमत्तेच्या सीमारेषेचा प्रश्न असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पालिकेने प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता आणि स्वच्छतागृहाच्या कम्पाउंडची हद्द निश्चित करावी. नवीन कम्पाउंडचे काम पूर्ण झाल्यानंतर बदल करणे कठीण होणार असल्याने सध्या उपलब्ध असलेल्या संधीचा विचार करून रस्ता रुंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वाहतुकीचा प्रश्न सुटण्याची शक्यता
रस्त्याचे वळण सरळ करून रुंदी वाढवल्यास समोरासमोर येणाऱ्या वाहनांना मार्ग मिळेल. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका कमी होऊन जुईपाडा ग्रामस्थांची दैनंदिन गैरसोय दूर होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.