

अग्रोलीतून रुजली ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा
१९६१ मध्ये भाऊ सखाराम पाटील यांचा पुढाकार
तुर्भे, ता. १५ (बातमीदार) ः गणेशोत्सवात घराघरात आणि विविध मंडळांच्या माध्यमातून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. नवी मुंबईतील अग्रोली गाव मात्र सहा दशकांपासून आजपर्यंत ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवत ऐक्याचा संदेश देत आहे.
१९६१ मध्ये साम्यवादी नेते भाऊ सखाराम पाटील यांनी तत्कालीन अग्रोली गावात ‘एक गाव, एक गणपती’ची संकल्पना मांडली. त्या काळात गावातील बहुतांश नागरिक मच्छीमारी, मिठागरातील काम तसेच भातशेतीवर अवलंबून होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक कुटुंबांना कर्ज घ्यावे लागत असल्याचे गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात. अशातच त्या वेळी या परिसरात फ्ल्युची साथ पसरली होती. प्रत्येक कुटुंबाने स्वतंत्रपणे गणेशमूर्तीची स्थापना करण्याऐवजी संपूर्ण गावासाठी एकच गणेशमूर्ती स्थापन करावी, असा विचार भाऊ सखाराम पाटील यांनी मांडला. यामुळे उत्सवाचा खर्च कमी होईल आणि गावातील सर्व नागरिक एकत्र येऊन उत्सव साजरा करू शकतील, असा त्यामागील उद्देश होता.
सुरुवातीला विरोध, नंतर सर्वांचा सहभाग
एकाच गणेशमूर्तीची स्थापना करण्याच्या कल्पनेला सुरुवातीला गावकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पारंपरिक पद्धतीत बदल केल्यास गणपतीचा कोप होईल, अशी भीती काही नागरिकांच्या मनात होती. मात्र, या संकल्पनेमागील सामाजिक आणि आर्थिक उद्देश हळूहळू गावकऱ्यांच्या लक्षात आला. त्यानंतर एकेक कुटुंब या उपक्रमात सहभागी होऊ लागले. पुढे संपूर्ण गावाने एकत्र येऊन ११ दिवस एकाच गणेशमूर्तीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली. काळ बदलला. गावाचा विस्तार झाला. नवी मुंबईचा विकास झाला मात्र अग्रोलीतील ही परंपरा आजही कायम आहे.
१,५०० कुटुंबांचा उत्सवात सहभाग
अग्रोली गावाचा विस्तार आता मोठ्या प्रमाणात झाला आहे. गावात सुमारे १,५०० कुटुंबे असून, गणेशोत्सवात प्रत्येक कुटुंब आपल्या परीने योगदान देते. घराघरात स्वतंत्र गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करता सर्वजण सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होतात. त्यामुळे उत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता गावाच्या सामाजिक एकतेचे प्रतीक बनला आहे. भाऊ पाटील यांचे नातू भूषण पाटील यांच्या मते, अग्रोली हे ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या पहिल्या गावांपैकी एक असून, या उपक्रमामुळे गावातील एकोपा अधिक दृढ झाला.
आज घराघरात गणपती विराजमान केले जातात. मात्र, याला बगल देत नवी मुंबईमधील आग्रोळी गावामध्ये ‘एक गाव एक गणपती’ उत्सव मागील ६६ वर्षांपासून मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो. सर्व राजकीय हेवेदावे बाजूला सारत एकत्रित १० दिवस बाप्पाची मनोभावी पूजा करून ऐक्याचा संदेश देतात.
- मनोज डोंगरे, ग्रामस्थ, अग्रोली गाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.