

आरतीच्या सुरांत माणुसकीचा धर्म
पी. पी. मार्गाच्या राजाची १७ वर्षे मुस्लिम कुटुंबाकडून सेवा
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : धर्माच्या नावावर भिंती उभ्या होत असताना कामाठीपुरातील पी. पी. मार्गावर मात्र आरतीच्या स्वरांतून माणुसकीचा सूर उमटतो. ‘पी. पी. मार्गाचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाची १७ वर्षे एका मुस्लिम कुटुंबाकडून मनोभावे सेवा केली जात आहे.
अब्बास दिलावर खान यांच्या नेतृत्वाखाली गणरायाची मूर्ती आणण्यापासून मंडप उभारणी, सजावट, आरती, हार-फुले आणि प्रसादापर्यंतची जबाबदारी खान कुटुंब आणि परिसरातील मुस्लिम बांधव प्रेमाने पार पाडतात. धर्माची ओळख मागे पडते आणि माणुसकीचे नाते पुढे येते, असे चित्र या उत्सवात दरवर्षी पाहायला मिळते.
पी. पी. मार्गावर १९६३ पासून बालगोपाल सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळातर्फे गणेशोत्सव साजरा केला जातो. खान कुटुंबाची या मंडळाशी अनेक दशकांची नाळ जुळली आहे. २००९ मध्ये मंडळाचे कार्यकर्ते शिर्डीला जात असताना झालेल्या भीषण अपघातात अध्यक्षांसह सहा जणांचा मृत्यू झाला. गणेशोत्सवाची परंपरा थांबू नये, म्हणून अब्बास खान यांनी पुढाकार घेतला. तेव्हापासून गेली १७ वर्षे ते बाप्पाच्या सेवेत अविरत आहेत.
‘अब्बास, बाप्पा कधी आणणार?’
गणेशोत्सव जवळ आला की परिसरातील मुस्लिम बांधवच अब्बास यांना विचारतात, ‘गणपती कधी आणणार?’ मोहम्मद अली, सलमान, पप्पू भाई यांच्यासह अनेक जण मंडप उभारणीपासून सजावट, गणपती आणण्याची व्यवस्था, आरती आणि हार-फुलांपर्यंत प्रत्येक कामात खांद्याला खांदा लावून सहभागी होतात. अब्दुल आरती करतात, तर अब्बास यांचा मुलगा साहिलही बाप्पाची आरती म्हणतो. या मंडपात कोण हिंदू आणि कोण मुस्लिम, हा प्रश्नच उरत नाही.
आरती ऐकत-ऐकत झाली पाठ
साहिल लहानपणापासून गणरायाच्या आरत्या ऐकत मोठा झाला. त्यामुळे हिंदू-मुस्लिम हा भेद समजण्याआधीच आरत्या त्याला पाठ झाल्या.
घरात प्रसाद, मनात प्रार्थना
अब्बास यांच्या पत्नी हसीना खान गणेशोत्सवाच्या १० दिवसांत घरी शिरा, चणे असा प्रसाद तयार करून मंडपात नेतात. या काळात घरात शाकाहार पाळला जातो. बाप्पाकडे त्यांची प्रार्थनाही स्वतःपुरती मर्यादित नसते. ‘सगळ्यांना सुखी ठेवावे, प्रत्येकाच्या घरात आनंद असावा,’ एवढीच त्यांची मागणी असते.
आम्ही वर्षानुवर्षे एकत्र सण साजरे करतो. बाप्पाची सेवा करताना हिंदू-मुस्लिम असा भेद आम्हाला कधी जाणवत नाही. एकमेकांच्या आनंदात सहभागी होऊन प्रेमाने राहणे, हाच खरा धर्म आहे.
- अब्बास दिलावर खान, अध्यक्ष, मंडळ
गणेशोत्सवाचे १० दिवस आमच्यासाठी घरच्या सणासारखे असतात. बाप्पाकडे माझी प्रार्थना एवढीच असते की, सगळ्यांना सुखी ठेवावे आणि प्रत्येकाच्या घरात आनंद असावा.
- हसीना खान, अब्बास खान यांच्या पत्नी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.