

जुईनगरमध्ये जलकुंभ, नेरूळला नवी स्मशानभूमी
पाणीटंचाईसह स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर
जुईनगर, ता. १५ (बातमीदार) : नेरूळ, जुईनगर आणि सानपाडा परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता स्मशानभूमी व पाणीपुरवठ्याच्या मूलभूत सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत नगरसेवक अभिजित देसाई यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेऊन निवेदन साद केले.
नेरूळ सेक्टर ४ येथील स्मशानभूमी अनेक वर्षे जुनी असून, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत तेथील सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे विद्यमान स्मशानभूमीच्या लगतच्या भूखंडावर अत्याधुनिक सुविधा असलेली नवीन स्मशानभूमी उभारण्याची मागणी करण्यात आली. अंत्यविधीसाठी आवश्यक सर्व सुविधा, नागरिकांसाठी प्रतीक्षास्थळ तसेच स्वच्छता आणि मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्याची गरज या वेळी अधोरेखित करण्यात आली.
दरम्यान, जुईनगर व सानपाडा सेक्टर १० परिसरात सिडकोच्या नव्या वसाहतींमुळे लोकसंख्या वाढत आहे. परिणामी पाण्याची मागणी वाढली असून, सध्या कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जुईनगर-सानपाडा परिसरात नवीन जलकुंभ उभारण्याची मागणी करण्यात आली.
आयुक्त शिंदे यांनी दोन्ही प्रश्नांची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना जागेची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.
पायाभूत सुविधांची गरज
जुईनगर, सानपाडा आणि नेरूळ परिसराचा वेगाने विस्तार होत असताना उपलब्ध पायाभूत सुविधा त्याच प्रमाणात वाढविणे आवश्यक आहे. विशेषतः पाणीपुरवठ्याचा प्रश्न नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असल्याने नवीन जलकुंभ उभारल्यास कमी दाबाचा आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने प्रस्तावित कामांना प्राधान्य देऊन तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.