पर्यावरणपूरक विसर्जनाला पसंती

पर्यावरणपूरक विसर्जनाला पसंती
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : गणरायाच्या आगमनानंतर अवघ्या दीड दिवसाच्या सेवेनंतर आज (ता. १५) भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहरातील विविध विसर्जनस्थळांवर दिवसभर भाविकांची गर्दी झाली होती. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात सुमारे १६ हजार ५५४ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये घरगुती गणेशमूर्तींची संख्या सर्वाधिक होती. दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देताना अनेक भक्त भावुक झाले होते. मूर्ती विसर्जनासाठी जाताना लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते. सुख-समृद्धीचे साकडे घालत आणि पुढील वर्षी लवकर येण्याची विनंती करत भाविकांनी वक्रतुंडाला निरोप दिला.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला यंदाही भक्तांनी प्रतिसाद दिला. शाडू माती, लाल माती आणि कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या मूर्तींचे काही भाविकांनी घरच्या घरी विसर्जन केले. घरातील हौदात मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर उर्वरित माती झाडांमध्ये टाकण्यात आली. वाहतूक कोंडी टाळण्याबरोबरच पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून घरगुती विसर्जनाचा हा पर्याय पुढे आला आहे.

परिमंडळनिहाय विसर्जन
परिमंडळ १ : ४ हजार १५५
परिमंडळ ५ : १२ हजार ३९८
एकूण : १६ हजार ५५४
विसर्जनस्थळे : १३२


घराजवळच विसर्जनाची सुविधा
ठाणे शहरात १३२ ठिकाणी व्यवस्था; महापालिका प्रशासन सज्ज

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : गणेशोत्सवातील विसर्जन सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी ठाणे महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. शहरातील विविध प्रभाग समित्यांच्या हद्दीत तब्बल १३२ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली आहे. नागरिकांना दूरच्या विसर्जन घाटांवर गर्दी करण्याऐवजी आपल्या परिसरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करता यावे, यासाठी कृत्रिम तलाव, विसर्जन टाक्या, मूर्ती स्वीकृती केंद्रे आणि फिरती विसर्जन व्यवस्था उपलब्ध केली आहे.

ठाणे शहरातील पारंपरिक विसर्जन घाटांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन महापालिकेने विविध भागांत पर्यायी व्यवस्था केली आहे. उथळसर, नौपाडा-कोपरी, कळवा, दिवा, मुंब्रा आणि माजिवडा-मानपाडा या प्रभाग समित्यांमध्ये खाडी घाटांवर विसर्जनाची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव आणि विसर्जन टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मासुंदा तलाव, कोपरी, कळवा, दिवा, रायलादेवी, उपवन, रेतीबंदर, कोलशेत, गायमुख आणि बाळकुम परिसरात विविध प्रकारच्या विसर्जन सुविधांची आखणी करण्यात आली आहे. मोठ्या गणेशमूर्तींसाठी पारंपरिक घाट, तर घरगुती गणेशमूर्तींसाठी टाक्या व कृत्रिम तलावांचा वापर करता येणार आहे.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांना घाटांवर जाण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी महापालिकेने फिरत्या विसर्जन वाहनांचीही व्यवस्था केली आहे. उथळसर, नौपाडा-कोपरी, कळवा, दिवा आणि मुंब्रा येथे प्रत्येकी एक ट्रक, तर माजिवडा-मानपाडा, लोकमान्य-सावरकर, वागळे आणि वर्तकनगर प्रभाग समित्यांमध्ये प्रत्येकी दोन ट्रक उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. या सुविधेमुळे लहान घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन परिसरातच करता येणार आहे. त्यामुळे विसर्जन घाटांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

दहा प्रभाग समित्यांमध्ये व्यवस्था
उथळसर भागात रुस्तमजी, परुळेकर मैदान, सिद्धेश्वर टाकी, मुख्यालयाजवळील परिसर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान येथे विसर्जन टाक्यांची व्यवस्था आहे. नौपाडा-कोपरीमध्ये कोपरी मीठबंदर घाटासह मासुंदा दत्त घाट, कोपरी कृत्रिम तलाव आणि विविध ठिकाणी टाक्या उपलब्ध आहेत. कळवा, दिवा आणि मुंब्रा परिसरात खाडी घाटांसोबत कृत्रिम तलावांची सुविधा करण्यात आली आहे. माजिवडा-मानपाडा भागात कोलशेत, बाळकुम आणि गायमुख घाटांसह विविध सोसायट्यांच्या परिसरात टाक्या व कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत.

नागरिकांना आवाहन
मूर्तींचे विसर्जन करताना नागरिकांनी महापालिकेने निश्चित केलेल्या अधिकृत विसर्जनस्थळांचा वापर करावा. नदी, नाले, खाडी अथवा इतर अनधिकृत ठिकाणी विसर्जन करून पर्यावरणाची हानी करू नये. विसर्जनाच्या वेळी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून उत्सव शांततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com