कासारवडवली उड्डाणपुलाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

कासारवडवली उड्डाणपुलाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : घोडबंदर मार्गावरील कासारवडवली उड्डाणपुलाला तडे गेल्याने वाहतूक सुरू असताना पूल हलत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या पुलाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला हा प्रकार समोर आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी पूल वाहतुकीसाठी बंद केला. आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) पुलाची तपासणी सुरू असून, अहवाल प्राप्त होईपर्यंत पूल बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

कासारवडवली उड्डाणपूल जुलै २०२५ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. घोडबंदर मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या पुलामुळे वाघबीळ ते गायमुखदरम्यानची वाहतूक सुरळीत होईल, असा दावा लोकार्पणावेळी करण्यात आला होता, मात्र वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर काही आठवड्यांतच पुलालगतचा रस्ता खराब झाल्याचे समोर आले होते. त्या वेळी कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराला ५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.

रस्ता खराब होण्याच्या प्रकारानंतर आता थेट उड्डाणपुलाला तडे जाणे आणि वाहतूक सुरू असताना त्यात हालचाल जाणवणे, हा प्रकार प्रकल्पाच्या एकूण दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. पुलाची तपासणी सुरू असल्याने तडे नेमके कशामुळे गेले, पुलाच्या संरचनेवर त्याचा कितपत परिणाम झाला आहे आणि पूल वाहतुकीसाठी सुरक्षित आहे का, हे अहवालातून स्पष्ट होणार आहे.

कोंडीची शक्यता
घोडबंदर मार्ग हा ठाण्याला मुंबई, नवी मुंबई तसेच पुढे राष्ट्रीय महामार्गांशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे कासारवडवली उड्डाणपूल बंद राहिल्यास त्याचा थेट परिणाम या मार्गावरील वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीचा भार वाढत असताना पर्यायी मार्गांवरही कोंडी होण्याची शक्यता आहे.

सेवा मार्गाचा आधार
घोडबंदरकडून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कासारवडली ओव्हरब्रिजऐवजी सेवा रस्त्याने पुढे जाता येणार आहे. अवजड वाहनांना कासारवडली ओव्हरब्रिजनंतर पुढील इच्छितस्थळी जाण्याची व्यवस्था आहे. हलक्या वाहनांना घोडबंदरकडून येताना विजय गार्डन चौक, पोखरण स्टेशनमार्गे सर्व्हिस रोडचा वापर करता येईल. कार, ऑटो, रिक्षा, मोटारसायकल आदी वाहनांना गायमुख ब्रिज, गायमुख चौकीमार्गे पुढे जाता येणार. ही वाहतूक व्यवस्था आज (ता. १५) रात्रीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com