उद्‍घाटनानंतर मनुष्यबळाचा शोध!

उद्‍घाटनानंतर मनुष्यबळाचा शोध!
Published on

उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : कोट्यवधींचा खर्च, अत्याधुनिक यंत्रणा आणि मोठ्या थाटात उद्‍घाटन; मात्र अवघ्या २४ तासांतच उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील डायलिसिस केंद्राला ‘ब्रेक’ लागला. तंत्रज्ञांच्या कमतरतेमुळे मंगळवारी सेवा ठप्प झाल्याने २४ डायलिसिस रुग्णांची चिंता वाढली आहे. पुरेसे मनुष्यबळ नसताना केंद्र सुरू करण्याची घाई का करण्यात आली, असा सवाल उपस्थित झाला आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून मध्यवर्ती रुग्णालयात सोमवारी मोठ्या थाटात सुरू केलेल्या डायलिसिस केंद्राची सेवा अवघ्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी तंत्रज्ञांअभावी बंद पडल्याने रुग्णांची मोठी गैरसोय झाली. सध्या रुग्णालयातील सुमारे २४ रुग्ण नियमित डायलिसिस उपचार घेत आहेत. अचानक सेवा ठप्प झाल्याने रुग्णांसह नातेवाइकांची चिंता वाढली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात डायलिसिस तंत्रज्ञांची तीन पदे मंजूर आहेत. मात्र दोनच पदांवर कर्मचारी कार्यरत होते. त्यापैकी एक तंत्रज्ञ १ सप्टेंबरपासून वैद्यकीय रजेवर असून, दुसऱ्या तंत्रज्ञाची ८ सप्टेंबर रोजीच नियुक्ती झाली आहे. डायलिसिस रुग्णांसाठी उपचारांतील सातत्य अत्यंत महत्त्वाचे असताना उद्‍घाटनानंतर अवघ्या २४ तासांत सेवा ठप्प झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या पूर्वतयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अत्याधुनिक सुविधा उभारण्यापूर्वी आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था का करण्यात आली नाही, असा सवालही उपस्थित होत आहे.

तंत्रज्ञांना मूळ कार्यालयात पाठवा!
रुग्णालयातील तंत्रज्ञ गजेंद्र वळवी हे पं. भीमसेन जोशी सामान्य रुग्णालय, मीरा-भाईंदर येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. त्यामुळे अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांनी तेथील वैद्यकीय अधीक्षकांना पत्र पाठवून वळवी यांना तातडीने कार्यमुक्त करून मूळ कार्यालयात पाठविण्याची विनंती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com