मातीच्या गणरायातून उमलणार तुळस

मातीच्या गणरायातून उमलणार तुळस
Published on

ठाणे, ता. १५ (बातमीदार) : मंगलमूर्ती आले... पर्यावरणाचा संदेश घेऊन! गणरायाच्या आगमनासोबत जल्लोष करण्याची परंपरा असताना, ठाण्यातील दिव्यांग मुलांनी यंदा गणेशाच्या माध्यमातून हिरवाईचा संदेश दिला आहे. मातीपासून साकारलेल्या गणेशमूर्तीच्या उदरात तुळशीच्या बिया पेरून, विसर्जनानंतर त्याच मातीतून तुळशीचे रोप उगवण्याचा अनोखा प्रयोग दिव्यांग कला केंद्राने केला आहे. ‘बाप्पाचं झाड’ या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम श्रद्धा, पर्यावरण संवर्धन आणि दिव्यांग मुलांच्या सर्जनशीलतेचा सुंदर संगम ठरत आहे.

या उपक्रमात शाडू माती किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शुद्ध लाल मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्यात आली. विशेष म्हणजे, मूर्ती तयार करतानाच त्यामध्ये तुळशीच्या बिया पेरण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या काळात दिव्यांग मुलांच्या हस्ते गणरायाचे पूजन, आरती आणि नैवेद्य करण्यात आला. उत्सवानंतर ही मूर्ती नदी, तलाव किंवा अन्य जलस्रोतांमध्ये विसर्जित न करता संस्थेच्या उद्यानातच विधिवत विसर्जित करण्यात आली. काही दिवसांनंतर याच मातीतून तुळशीचे रोप उगवते. या रोपाला ‘बाप्पाचं झाड’ असे नाव देण्यात आले आहे. या उपक्रमाला आमदार रवींद्र फाटक, ठाणे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील, उद्यमी महाराष्ट्राचे ओंकार हरी माळी, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राजीव गोडबोले, संगीतकार किरण वेहेले, गजानन महाराज मंदिर ट्रस्टचे विनय जोशी, अभिनेते मंगेश देसाई आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com