‘स्पा’नंतर डान्सबारचीही चर्चा

‘स्पा’नंतर डान्सबारचीही चर्चा
Published on

अंबरनाथ, ता. १५ (वार्ताहर) : शहरातील मटका, जुगार आणि अमली पदार्थांच्या कथित विक्रीनंतर आता स्पा सेंटरमधील गैरप्रकार आणि डान्सबारच्या चर्चेने अनैतिक व्यवसायांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील काही स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत. त्यातच रेल्वे स्थानक परिसरातील एका बारमध्ये डान्सबार सुरू झाल्याच्या चर्चेनेही खळबळ उडाली आहे.
शहरातील विविध भागांत स्पा सेंटरची संख्या वाढली आहे. त्यातील काही ठिकाणी मसाजच्या नावाखाली अतिरिक्त सेवा दिल्या जात असल्याचा आरोप आहे. कुटुंबीय आणि लहान मुलांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या व्यावसायिक संकुलांच्या परिसरातही असे सेंटर सुरू असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे. या कथित प्रकारांकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांची आहे. दरम्यान, या प्रकारांमागे आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चा असून, काही संबंधितांकडून अधिकाऱ्यांना दरमहा पैसे दिले जात असल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. मात्र, या आरोपांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे प्रशासनाने वस्तुनिष्ठ चौकशी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरातील मटका, जुगार, अमली पदार्थांची कथित विक्री, स्पा सेंटरमधील गैरप्रकार; तसेच डान्सबारच्या आरोपांबाबत प्रशासनाने व्यापक तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


रेल्वे स्थानक परिसरातील बार चर्चेत
अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेरील ‘समाधान’ रेस्टॉरंट अँड बारच्या पहिल्या मजल्यावर डान्सबार सुरू आहे. या डान्सबारसाठी आवश्यक परवानग्या आहेत का, तसेच संबंधित बांधकाम अधिकृत आहे का, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी अंबरनाथ नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली आहे. ऐतिहासिक शहरात डान्सबार सुरू करून भावी पिढीचे भविष्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असेल, तर हे सहन केले जाणार नाही. एकेकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात डान्सबारविरोधात कठोर भूमिका घेतली होती. त्याच पद्धतीने हा डान्सबार मी फोडणार, अशी तीव्र त्यांनी दिली.

प्रशासनाची प्रतिक्रिया
अतिक्रमण विभागाचे अधिकारी नरेंद्र संखे यांनी यासंदर्भात ही बाब पोलिस प्रशासनाच्या अखत्यारित येत असल्याचे सांगत, या प्रकरणाची जबाबदारी पोलिस प्रशासनाकडे असल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com