सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मिठाई आणि दुग्धविक्री केंद्रांवर अन्न व औषध प्रशासनाचा बडगा

सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मिठाई आणि दुग्धविक्री केंद्रांवर अन्न व औषध प्रशासनाचा बडगा
Published on

नऊ आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबईतील मिठाई, दुग्धविक्री केंद्रांवर एफडीएचा बडगा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिठाई, खवा, पनीर, तूप आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील मिठाई दुकाने आणि दुग्धविक्री केंद्रांविरोधात विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळलेल्या नऊ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांनी ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान मुंबईतील ३८ खाद्य आस्थापनांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान खवा, मिठाई, पनीर आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांचे ४७ नमुने घेऊन ते प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. खाद्यपदार्थांची गुणवत्ता, त्यांची साठवणूक, स्वच्छता, विक्रीची पद्धत आणि त्यावरील माहिती यांची तपासणी करण्यात आली.
अंधेरी येथील आयुष दूध पुरवठादार या आस्थापनावर कारवाई करताना २३ किलो बर्फी आणि कमी चरबीयुक्त पनीरचा साठा जप्त करण्यात आला. हे पदार्थ योग्य पद्धतीने साठवण्यात आले नसल्याचे तसेच त्यावरील माहितीपत्रकात आवश्यक माहिती योग्य प्रकारे नमूद करण्यात आली नसल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे संबंधित खाद्यपदार्थांचा साठा ताब्यात घेण्यात आला.

मुलुंड येथील बृजवासी मिठाई या आस्थापनातून २२५ किलो खवा जप्त करण्यात आला आहे. या खव्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित आस्थापनाविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने मुंबईतील नऊ मिठाई आणि दुग्धविक्री आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये अंधेरी येथील चंद्रूज शुद्ध तूप मिठाई, ग्रँट रोड येथील पंजाबी चंदू हलवाई, विलेपार्ले येथील श्री नारायण डेअरी, खार येथील गुलशन डेअरी फार्म, घाटकोपर येथील त्रिभुवन डेअरी फार्म, घाटकोपर येथील महावीर काजू व खाद्यपदार्थ आणि जोगेश्वरी येथील अग्रवाल स्वीट मार्ट यांचा समावेश आहे. याशिवाय कंजूरमार्ग येथील कृष्णा मिठाई व अल्पोपाहार केंद्रावर २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सणासुदीच्या काळात भेसळीचा धोका वाढतो
गणेशोत्सव आणि अन्य सणांच्या काळात खवा, पनीर, तूप, मिठाई आणि सुकामेवा यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ बाजारात विकले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे.

खाद्यपदार्थांची योग्य साठवणूक केली जात आहे का, त्यांची गुणवत्ता योग्य आहे का, स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत का, तसेच खाद्यपदार्थांवर आवश्यक माहिती नमूद केली आहे का, याची तपासणी करण्यात येत आहे. अन्नसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com