

रोबोटिक बोया ठरतोय शोभेची बाहुली
हरिहरेश्वर येथे प्रशिक्षित जीवरक्षकांअभावी सुरक्षेचा प्रश्न अधांतरी
श्रीवर्धन, ता. १६ (वार्ताहर) ः हरिहरेश्वर येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून ग्रामपंचायतीला अत्याधुनिक रोबोटिक बोया दिला आहे, मात्र हे उपकरण चालवण्यासाठी अद्याप एकाही प्रशिक्षित जीवरक्षकाची (लाइफगार्ड) नियुक्ती करण्यात न आल्याने, आपत्कालीनप्रसंगी हा बोया शोभेची बाहुली बनण्याची शक्यता असून, सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
हरिहरेश्वर येथे श्री काळभैरव मंदिरात भाविकांची गर्दी, शुक्ल तीर्थावर होणारे धार्मिक विधी आणि पर्यटनामुळे वर्षभर समुद्रकिनारी मोठी वर्दळ असते. अनेकदा पर्यटक भरती-ओहोटीचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात खेचले जातात. स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे अनेक दुर्घटना टळतात. तरी कायमस्वरूपी सुरक्षेची गरज ओळखून प्रशासनाने रोबोटिक बोया ग्रामपंचायतीला दिला आहे. हा बोया वजनाने अत्यंत हलका असून, रिमोटच्या साहाय्याने पाण्यात वेगाने नियंत्रित केला जातो. खोल पाण्यात अवघ्या काही सेकंदात पोहोचून ५०० किलोग्रॅमपर्यंतचे वजन किनाऱ्यावर खेचून आणण्याची क्षमता यात आहे, परंतु जीवरक्षकच उपलब्ध नसल्याने हा आधुनिक बोया सध्या वापराविना पडून राहिला आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून बोया मिळाला असला तरी जीवरक्षकाची नियुक्ती झालेली नाही. प्रशासनाने स्थानिकांना हा बोया हाताळण्याचे प्रशिक्षण द्यावे किंवा तत्काळ जीवरक्षकाची नेमणूक करावी, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांचे प्राण वाचवता येतील.
- अमित खोत, माजी सरपंच, हरिहरेश्वर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.