‘बाप्पा, यंदा सांभाळून घ्या!’

‘बाप्पा, यंदा सांभाळून घ्या!’
Published on

‘गणराया, यंदा सांभाळून घ्या!’
खड्ड्यांविरोधात पनवेलकराचा अनोखा एल्गार
पनवेल, ता. १६ (बातमीदार) ः गणेशोत्सवाच्या काळातही शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य कायम असल्याने यंदा नागरिकांच्या तोंडी ‘गणराया, यंदा जरा सांभाळून घ्या’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. वारंवार तक्रारी करूनही दुरुस्ती होत नसल्याने प्रणीत अमृते या तरुणाने खड्ड्यात अनोखे आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
पनवेल शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोका निर्माण होतो. प्रणीत अमृते यानेही याचा फटका बसला असून, दुचाकीवरून प्रवास करताना पुढे खड्डा आल्याने त्याला ब्रेक दाबला. त्याचवेळी मागून येणाऱ्या वाहनाची त्याच्या दुचाकीला धडक बसली आणि तो जखमी झाला. या वैयक्तिक अनुभवातून खड्ड्यांचा प्रश्न केवळ दुरवस्थेपुरता मर्यादित नसून, तो नागरिकांच्या सुरक्षिततेशी जोडलेला असल्याची भावना प्रणीत याने मांडली. प्रणीत याच्या आंदोलनानंतर नगरसेवक राजू सोनी आणि नगरसेविका शिवानी घरत यांनी त्यांच्याशी संपर्क साधला.

खड्ड्यातच खुर्ची आणि चहा
प्रणीत याने एका खड्ड्यात खुर्ची टाकली आणि तेथेच बसून चहा-बिस्कीट खाण्यास सुरुवात केली. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केलेला हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. खड्डा इतका मोठा आहे की इथे बसता येते, चहा पिता येतो आणि वर्तमानपत्रही वाचता येते, असा उपरोधिक संदेशच त्याच्या या आंदोलनातून देण्यात आला. त्यानंतर तो स्पायडरमॅनची वेशभूषा परिधान करून खड्ड्यात बसला.

तात्पुरते खड्डे बुजवून उपयोग काय?
प्रणीत अमृते याने स्वतःच्या परीनेही खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्याने माती आणि खडी टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला; मात्र पावसाच्या पाण्यामुळे ही सामग्री वाहून गेली. कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यासाठी काँक्रीट किंवा अन्य बांधकाम करणे आपल्या आवाक्याबाहेर असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्याने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com