

कल्याण, ता. १६ (वार्ताहर) : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्यांमधून दरवर्षी सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य केले जाते. यंदा रामबाग येथील विजय तरुण मंडळाने ‘पक्षांतर बंदी कायद्याला भावपूर्ण श्रद्धांजली’ अशा आशयाचा देखावा साकारत राजकीय पक्षांतराच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. या देखाव्याची गणेशोत्सवात चर्चा सुरू आहे.
जनादेशाचा सन्मान आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने १९८५ मध्ये संविधानाच्या दहाव्या अनुसूचित पक्षांतराच्या आधारावर अपात्रतेच्या तरतुदी करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर सध्याच्या राजकीय परिस्थितीत या तरतुदी कितपत प्रभावी ठरतात, असा प्रश्न मंडळाने देखाव्यातून उपस्थित केला आहे. निवडणुकीनंतर बदलणाऱ्या राजकीय भूमिका, सत्ता आणि पदाच्या राजकारणातून होणारे पक्षांतर; तसेच मतदारांच्या जनादेशाचा होणारा परिणाम यावर देखाव्यातून भाष्य करण्यात आले आहे.
पक्षांतराच्या मुद्द्यासोबतच लोकशाही, संविधान आणि जनतेचा विश्वास यांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच नागरिकांमध्ये सामाजिक आणि राजकीय विषयांवर विचारमंथन घडवून आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. विजय तरुण मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा ६३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने साकारलेला देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, ‘संविधान चिरायू होवो, लोकशाही चिरायू होवो’ असा संदेश मंडळाने दिला आहे.
देखाव्यात मांडलेले संदेश
‘आमचे मत विकासासाठी आहे; आमचा विश्वास सत्तेच्या सौद्यासाठी नाही. आमचा जनादेश कुणाच्या स्वार्थाची मालमत्ता नाही’, अशा आशयाचे संदेश देखाव्यात मांडण्यात आले आहेत. तसेच प्रतिनिधीची निवड जनतेच्या मतातून होत असताना त्याने भूमिका बदलल्यास मतदारांच्या विश्वासाचे काय, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.