

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात गणरायाचे सोमवारी (ता. १४) आगमन झाल्यानंतर मंगळवारी (ता. १५) दीड दिवसाच्या सेवेनंतर निरोप देताना डीजेच्या दणदणाटाला काहीसा लगाम बसल्याचे दिसून आले, तर दुसरीकडे ढोल-ताशे, बँजो आणि ध्वनिवर्धकांच्या कर्णकर्कश आवाजाने ठाणेकरांची सुटका झालेली नाही. विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे आणि डॉल्बीच्या वापरात सुमारे २० टक्के घट झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले, मात्र विविध वाद्ये आणि ध्वनिवर्धक एकाचवेळी सुरू झाल्याने शहरातील रात्री उशिरापर्यंत आवाजाची पातळी ९५ ते १०० डेसिबलपर्यंत पोहोचली, तर पी.एन. गाडगीळ शोरूम परिसरात तब्बल ९५ ते १०० डेसिबल ध्वनीपातळी नोंदविण्यात आली.
गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रात्री ८.३० ते ११ वाजेदरम्यान शहरातील विविध ठिकाणी ध्वनीपातळीची पाहणी करण्यात आली. आर.एम. रोड येथे रात्री ८.४५ वाजता ९० डेसिबल, तर एम. जी. रोडवरील नऊपाडा पोलिस ठाण्याजवळ ८.५३ वाजता ९५ डेसिबल आवाजाची नोंद झाली. या परिसरात ढोल आणि बँजोचा वापर सुरू होता. राम मारुती रोड, शिवाईनगर आणि पाचपाखाडी येथे ध्वनीपातळी ९० ते ९५ डेसिबलदरम्यान राहिली. अराधना टॉकीज परिसरात ८० ते ८५, वर्तकनगर पोलिस ठाणे परिसरात ८० ते ८५, तर एमआरआर हॉस्पिटलजवळ ८५ ते ९० डेसिबल आवाज नोंदविण्यात आला. ठाणे महापालिका परिसरात तुलनेने कमी म्हणजे ७० ते ७५ डेसिबल ध्वनी आढळला.
रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ध्वनिप्रदूषणाने उच्चांक गाठला. राम मारुती रोड येथे ९० ते ९५ डेसिबल, तर त्यानंतर पी. एन. गाडगीळ शोरूम परिसरात तब्बल ९५ ते १०० डेसिबल ध्वनीपातळी नोंदविण्यात आली. या ठिकाणी डीजेसह अनेक ढोल एकाचवेळी सुरू असल्याचे निरीक्षणात नमूद करण्यात आले आहे. तलावपाळी येथे रात्री ११.०७ वाजता ९० ते ९५ डेसिबल आवाजाची नोंद झाली असल्याची माहिती दक्ष नागरिक डॉ. महेश बेडेकर यांनी दिली.
फिल्मी गाण्यांचा आवाज कमी
मागील वर्षांच्या तुलनेत बॉलीवूड किंवा फिल्मी गाणी मोठ्या आवाजात वाजविण्याचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षणात नमूद करण्यात आले आहे. डीजे आणि डॉल्बीच्या वापरातही सुमारे २० टक्के घट झाली, मात्र ढोल-ताशे, बँजो आणि ध्वनिवर्धक हे ध्वनिप्रदूषणाचे प्रमुख स्रोत ठरले. मिरवणुका पुढे सरकत असताना अनेक वाद्ये एकत्र वाजल्याने रात्री उशिरा आवाजाची पातळी वाढल्याचे दिसून आले.
ध्वनीपातळीची नोंद
ठिकाण वेळ ध्वनीपातळी (डीबीमध्ये)
आर. एम. रोड ८.४५ ९०
एम. जी. रोड, नौपाडा ८.५३ ९५
राम मारुती रोड ९.१० ९० ते ९५
शिवाईनगर ९.४० ९० ते ९५
पाचपाखाडी १०.१० ९० ते ९५
राम मारुती रोड ११.०० ९० ते ९५
पी. एन. गाडगीळ शोरूम ११.०५ ९५ ते १००
तलावपाळी ११.०७ ९० ९५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.