शासकीय योजनांसाठी ‘सेवा संकल्प’!

शासकीय योजनांसाठी ‘सेवा संकल्प’!
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : नागरिकांना सरकारी योजनांची माहिती असूनही त्याचा लाभ घेण्यासाठी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी ठाणे जिल्हा परिषद आता गावपातळीवर पोहोचणार आहे. सरकारच्या निर्देशानुसार उद्या (ता. १७) पासून १७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच गावागावात सामाजिक, आरोग्य, स्वच्छता आणि जनजागृतीचे उपक्रम राबविले जाणार आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी अभियानाच्या तयारीसाठी मंगळवारी (ता. १५) संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रत्येक विभागाने स्वतंत्र नियोजन न करता समन्वयाने काम करावे आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सेवा अधिक गतिमान करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अभियानाचा महत्त्वाचा भाग म्हणून प्रत्येक तालुक्यात ‘सेवा सेतू’ शिबिरे घेण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांना थेट लाभ मिळवून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे योजना आणि लाभार्थी यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे.

‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमातून गाव आणि वाडी पातळीवर स्थानिक गरजेनुसार विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छता, आरोग्य तपासणी, योग-ध्यान, प्लॅस्टिकमुक्ती, जलसंधारण, कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंग याबरोबरच महिला आरोग्य, पोषण आणि ॲनिमियाबाबत जनजागृती केली जाणार आहे. याशिवाय सायबर सुरक्षा, रस्ते सुरक्षा, दिव्यांगजनांना सहकार्य, मतदार जागृती आणि शासकीय योजनांची माहिती देण्याचे उपक्रमही राबविले जाणार आहेत. या उपक्रमांसाठी गट विकास अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.

अंगणवाडी उत्सवात माता-बालकांचा सहभाग
अभियानात सेवा ज्योत यात्रा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, अंगणवाडी उत्सव, आशीर्वादाचा दिवा आणि बदलाची गोष्ट यांसारख्या उपक्रमांचाही समावेश आहे. अंगणवाडी उत्सवाच्या माध्यमातून माता आणि बालकांना सहभागी करून आरोग्य व पोषण योजनांची माहिती दिली जाणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्त्यांचा सन्मानही करण्यात येणार आहे.

योजनांच्या यशोगाथा गावागावात
शासकीय योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात झालेला बदल ‘बदलाची गोष्ट’ या उपक्रमातून मांडण्यात येणार आहे. तर ‘नमो सेवागाथा’अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि ग्रामपंचायतींच्या स्तरावर कला व नाट्य पथकांच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. दरम्यान, अभियानातील प्रत्येक उपक्रमाची माहिती, लाभार्थ्यांचा तपशील तसेच फोटो, व्हिडिओ आणि रील्सचे संकलन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com