

वाशी रुग्णालयात मिळणार कॉर्पोरेट सुविधा
पालिकेचा ४२ कोटींचा ‘मेगा प्लॅन’
गरिबांना मिळणार कॉर्पोरेट दर्जाचे मोफत, अत्यल्प दरात उपचार
नवी मुंबई, ता. १६ : पालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयाचा कायापालट होणार आहे. सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना आता खासगी कॉर्पोरेट रुग्णालयांच्या धर्तीवर आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने सुमारे ४२ कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे.
पालिकेने रुग्णालयाकरिता बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, ऐरोली अशा भागांत अत्याधुनिक व सुसज्ज इमारती उभारल्या आहेत. मात्र, अर्धवट उपकरणे आणि मनुष्यबळाअभावी या इमारती केवळ शोभेच्या ठरल्या असून, अनेक रुग्णांना उपचारासाठी शहराबाहेरच्या रुग्णालयाकडे जावे लागत होते. आता नव्या प्रस्तावानुसार त्याला बळकटी मिळणार आहे. तसेच आग तत्काळ विझवण्यासाठी अत्याधुनिक स्मोक डिटेक्टर प्रणालीदेखील बसवण्यात येणार आहे. याअंतर्गत अत्याधुनिक मॉड्युलर आयसीयू, नवजात बालकांसाठी मॉड्युलर एनआयसीयू/पीआयसीयू आणि आगीच्या संकटातून रक्षण करणारी स्वयंचलित धूर व काजळी निष्कासन प्रणाली उभारली जाणार आहे. या सर्व प्रकल्पांचा प्रशासकीय प्रस्ताव महासभेकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या सर्व प्रस्तावांना महासभेची प्रशासकीय मान्यता मिळताच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल.
बालमृत्यू दर रोखण्यासाठी स्मार्ट एनआयसीयू व पीआयसीयू
नवी मुंबईसह शेजारच्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील गंभीर आजारी नवजात बालकांसाठी वाशी रुग्णालय हे संजीवनी मानले जाते. बालमृत्यूचे प्रमाण रोखणे आणि आरोग्यसेवांचा दर्जा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार उंचावण्यासाठी महापालिकेने ३१ खाटांचे अत्याधुनिक मॉड्युलर एनआयसीयू व पीआयसीयू उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता एनआयसीयू-१चे १५ बेड, एनआयसीयू-२चे १० बेड आणि पीआयसीयू करिता सहा बेड अशी ३१ बेडची रचना करण्यात आली आहे. चार हजार ५०० चौरस फूट क्षेत्रफळात संसर्ग नियंत्रणासाठी विशेष अँटिबॅक्टेरियल भिंती, हेपा फिल्टर, प्रगत एचव्हीएसी प्रणाली आणि सेंट्रल मॉनिटरिंग प्रणाली बसवली जाईल. याकरिता सुमारे २५ कोटी ८८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
गोल्डन अवरमध्ये गंभीर रुग्णांना त्वरित उपचार
गंभीर रुग्णांना आपत्कालीन स्थितीत मुंबई किंवा महागड्या खासगी रुग्णालयांमध्ये हलवावे लागू नये, यासाठी सध्याच्या आयसीयू विभागाचे अद्ययावतीकरण केले जात आहे. बेडसंख्येत वाढ करीत सद्य:स्थितीतील १० आयसीयू बेडवरून १४ आणि पाच एसआयसीयू बेडवरून सहा अशा एकूण २० बेडची सुधारित मॉड्युलर रचना केली जाणार आहे. या कक्षात ५-फंक्शन मोटराइज्ड आयसीयू २० बेड, १०० सिरेंज इन्फ्युजन पंप, पेडेंट सिस्टीम, यूपीएस बॅकअप आणि सेंट्रल मॉनिटरिंग प्रणाली उभारली जाणार आहे. यासाठी सुमारे ११ कोटी ५३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
५० स्मार्ट स्मोक एक्स्ट्रॅक्शन प्रणाली
दुर्घटनेच्या वेळी आगीपेक्षा धुरामुळे श्वास गुदमरून होणारे मृत्यू टाळण्यासाठी वाशी रुग्णालयात देशातील उच्च दर्जाची सुरक्षा यंत्रणा बसवण्यात येणार आहे. आयसीयू, ऑपरेशन थिएटर, कॅथलॅब व पॅथॉलॉजी अशा २४ तास सुरू असणाऱ्या संवेदनशील विभागांमध्ये ५० स्वयंचलित स्मोक व सूट डिटेक्टर कम एक्स्ट्रॅक्शन सिस्टीम बसवण्यात येणार आहेत. ही प्रणाली मानवी हस्तक्षेपाशिवाय धूर आणि विषारी काजळी तत्काळ शोषून घेते आणि हवा शुद्ध ठेवते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.