सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे कृत्रिम कुंडातच विसर्जन

सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे कृत्रिम कुंडातच विसर्जन
Published on

सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे कृत्रिम कुंडातच विसर्जन
न्यायालयीन आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी
तुर्भे, ता. १६ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम जलकुंडातच करण्याची व्यवस्था नवी मुंबई महापालिकेने सुनिश्चित करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. नैसर्गिक तलाव, खाडी व अन्य जलस्रोतांमध्ये या मूर्तींचे विसर्जन होणार नाही, यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम जलकुंडात करावे. तसेच सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जनही कृत्रिम जलकुंडातच करणे अनिवार्य असल्याचे मंचने म्हटले आहे. यासाठी शहरातील सर्व विसर्जनस्थळांवरील कृत्रिम जलकुंडांची संख्या, ठिकाणे, क्षमता आणि कार्यरत स्थिती महापालिकेने जाहीर करावी.
दरम्यान, १४ ऑगस्ट २०२६च्या आदेशातील संदर्भाबाबत २० ऑगस्टला ‘स्पीकिंग टू द मिनिट्स’ आदेशाद्वारे दुरुस्ती करण्यात आली असून, त्यात ९ जून २०२५ ऐवजी २४ जुलै २०२५ असा संदर्भ करण्यात आला आहे. त्यामुळे गणेशोत्सव २०२६ मध्ये न्यायालयीन निर्देशांची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे असल्याचे मंचने स्पष्ट केले.

फलकांसह प्रभावी यंत्रणा
विसर्जनस्थळी स्पष्ट सूचना फलक लावून नागरिकांना लेखी माहिती द्यावी तसेच पोलिस प्रशासनाच्या समन्वयाने न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मंचने केली आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून परस्परविरोधी तोंडी सूचना दिल्या जाऊ नयेत, यासाठीही महापालिकेने स्पष्ट सूचना द्याव्यात, असे मंचने म्हटले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com