गणेशोत्सवाच्या सुट्टीत ई-कचरा व्यवस्थापन वेबिनार

गणेशोत्सवाच्या सुट्टीत ई-कचरा व्यवस्थापन वेबिनार
Published on

ई-कचरा व्यवस्थापन वेबिनारला अनेकांची दांडी
गणेशोत्सवाच्या सुट्टीत आदेश वेळेत न पोहोचल्याचे कारण
मुंबई, ता. १६ : गणेशोत्सवाच्या सुट्टीतच शालेय शिक्षण विभागाने राष्ट्रीय स्तरावरील ई-कचरा व्यवस्थापनविषयक वेबिनार आयोजित केल्याने शिक्षण विभागाची धावपळ उडाली. बुधवारी (ता. १६) सकाळी १० ते ११ या वेळेत ‘मिशन लाइफ’अंतर्गत इको क्लब्सच्या माध्यमातून ठोस कचरा व्यवस्थापन व ई-कचरा व्यवस्थापनावर राष्ट्रीय वेबिनार घेण्यात आले, मात्र सुट्टीच्या काळात शिक्षक आणि मुख्याध्यापकांपर्यंत याचे आदेशच पोहोचले नाहीत. परिणामी असंख्य जण उपस्थित राहू शकले नाहीत, तर काहींनी आदेश मिळाल्यानंतरही सुट्टींचा आधार घेत दांडी मारल्याचे दिसले.
विद्यार्थी, शिक्षक तसेच संबंधित घटकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन देणे, हा वेबिनारचा प्रमुख उद्देश होता. यासाठीच वेबिनारचे थेट प्रक्षेपण अधिकृत यूट्युब वाहिनीवर करण्यात आले. याचे अध्यक्षस्थान शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातील सचिव (एसईएल) यांनी भूषविले. या वेबिनारबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाने एकदिवस अगोदार म्हणजेच १५ सप्टेंबरला दुपारी अधिकारी आणि शाळांना पाठविले होते. यात शाळांना सुट्टी असल्याने बहुतांश मुख्याध्यापक व शिक्षक घरी असताना अवघ्या एका दिवसाच्या अंतराने वेबिनार आयोजित करण्यात आल्याने संबंधितांपर्यंत आदेश पोहोचविण्याची कसरत शिक्षण विभागाला करावी लागली, तर काहींना ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने हे वेबिनार पाहता आले नसल्याचे सांगितले.

असे होते निर्देश
वेबिनारमध्ये अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांनी शाळांच्या अधिकृत संकेतस्थळांसह सोशल मीडिया आणि इतर संवादमाध्यमांतून माहिती प्रसारित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहभागाची आकडेवारी १६ सप्टेंबरला वेबिनार संपेपर्यंत गुगल फॉर्मद्वारे सादर करण्यास सांगण्यात आले होते.
--
यावर होता भर
इको क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कचरा वर्गीकरण, पुनर्वापर, प्लॅस्टिकमुक्त परिसर, वृक्षारोपण, पाणी व ऊर्जा बचत तसेच ई-कचऱ्याचे योग्य संकलन आणि विल्हेवाट याबाबत जनजागृती केली जाते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या ‘मिशन लाइफ’चाही पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्यास नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी या वेबिनारमध्ये भर देण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com