२० हजार ७०३ गणेशमूर्तींचे विसर्जन

२० हजार ७०३ गणेशमूर्तींचे विसर्जन
Published on

ठाणे, ता. १६ : ढोल-ताशांचा निनाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने दुमदुमलेले विसर्जन घाट, अशा भक्तिभावपूर्ण आणि उत्साही वातावरणात ठाणेकरांनी दीड दिवसाच्या गणरायाला मंगळवारी (ता. १५) भावपूर्ण निरोप दिला. महापालिका क्षेत्रात दिवसभरात तब्बल २० हजार ७०३ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेला भाविकांनी दिलेला प्रतिसाद विशेष ठरला.

गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी ठाणे महापालिकेने शहरभर विविध पर्याय उपलब्ध करून दिले होते. त्याचा वापर करत १५ हजार ६७७ मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये, तर चार हजार ५४८ मूर्तींचे विशेष हौद व टाक्यांमध्ये विसर्जन करण्यात आले. फिरत्या विसर्जन व्यवस्थेचा लाभ घेत १२४ मूर्तींचे, तर महापालिकेच्या मूर्ती स्वीकृती केंद्रांमध्ये जमा झालेल्या ३५४ मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. यंदा शहरातील ७४ ठिकाणी विशेष हौद, २३ ठिकाणी कृत्रिम तलाव, १० मूर्ती स्वीकृती केंद्रे आणि १५ फिरत्या विसर्जन व्यवस्था उपलब्ध होत्या.

कल्याण-डोंबिवलीत १६ हजार मूर्तींचे विसर्जन
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्तींचे मंगळवारी रात्री भक्तिमय आणि शांत वातावरणात विसर्जन करण्यात आले. महापालिका क्षेत्रात एकूण १६ हजार ६६६ मूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये पाच हजार ८८७ शाडूच्या, तर १० हजार ७७९ पीओपीच्या मूर्तींचा समावेश आहे.

विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी महापालिकेने शहरातील विविध विसर्जनस्थळांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. महापालिका आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे यांच्यासह अधिकाऱ्यांनी विविध विसर्जनस्थळांची पाहणी केली.

प्रमुख विसर्जनस्थळी वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची बोट, सुरक्षारक्षक, लाइफजॅकेट आणि गोताखोरांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच ८१ ठिकाणी जनरेटर, २ हजार ६५३ एलईडी दिवे, ११५ लाइटिंग टॉवर, ४२ ठिकाणी २३६ सीसीटीव्ही कॅमेरे आणि १२ ड्रोनद्वारे निगराणी ठेवण्यात आली. या वेळी जमा झालेले ३९.२ टन निर्माल्य डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानच्या खत प्रकल्पाकडे पाठविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com