

१,१०० जणांसाठी ‘आपदा मित्र’ धावले
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १६ : अतिवृष्टी, पूर, दरडी आणि चक्रीवादळासारख्या आपत्तीच्या काळात प्रशासनाच्या मदतीला धावून जाणारे ‘आपदा मित्र’ रायगड जिल्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील सुमारे १,१०० जणांना संकटातून बाहेर काढण्यासाठी या स्वयंसेवकांनी प्रयत्न केले आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यापासून दरडीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यापर्यंत विविध मदतकार्यात त्यांचा सहभाग राहिला आहे.
निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळानंतर जिल्ह्यात आपत्तीच्या वेळी स्थानिक पातळीवर तातडीने मदत उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘आपदा मित्र’ उपक्रम सुरू केला. १८ ते ४० वयोगटातील स्थानिक नागरिकांची निवड करून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यात सुमारे ३०० आपदा मित्रांची निवड करण्यात आली असून, महाड, माणगाव, पनवेल आणि पेण येथे त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
रायगडला गेल्या काही वर्षांत चक्रीवादळांसह अतिवृष्टी आणि दरडींच्या संकटाला सामोरे जावे लागले. निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन तालुक्यांना मोठा फटका बसला. वीजवाहिन्या, खांब आणि रोहित्रे उखडल्याने अनेक गावे काही काळ अंधारात होती. सुपारी, आंबा आणि काजूच्या बागांचे नुकसान झाले. हजारो घरांची छपरे आणि पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर २०२१ मध्ये महाड आणि पोलादपूर तालुक्यांत झालेल्या दरडींमुळेही जीवित व वित्तहानी झाली.
आपत्तीच्या काळात तत्पर मदत
गेल्या तीन वर्षांत जून-जुलै महिन्यातील अतिवृष्टीदरम्यान आपदा मित्रांनी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम केले. पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे, दरडीच्या धोक्यातील कुटुंबांना बाहेर काढणे, आपद्ग्रस्तांना आधार देणे आणि घटनास्थळाची माहिती प्रशासनाला देणे, अशी कामे त्यांनी केली. यंदाही जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून झालेल्या मुसळधार पावसात अनेक भागांत त्यांनी तातडीने मदतकार्य केले. आतापर्यंत सुमारे १,१०० जणांना संकटातून बाहेर काढण्यात आपदा मित्रांचा सहभाग राहिला असून, आपत्तीच्या काळात प्रशासन आणि नागरिकांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून त्यांची भूमिका ठरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.