

११ रुपयांचे सलाइन ३२५ रुपयांना!
दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : रुग्णालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय साहित्याची खरेदी किंमत आणि त्यावरील छापील किंमत यात (एमआरपी) मोठी तफावत असल्याचे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पाहणीत निदर्शनास आले आहे. त्यात ११.०५ रुपयांना खरेदी केलेल्या सलाइनच्या संचावर ३२५ रुपये किंमत छापले होते. तब्बल २,८४१ टक्क्यांनी अधिक किमतीला त्याची विक्री होत असल्याने एफडीने वैद्यकीय साहित्य व उपकरणांच्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाकडे (एनपीपीए) प्रस्ताव सादर केला आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, ११.०५ रुपयांच्या सलाईन संचावर ३२५ रुपये, ६.७५ रुपयांच्या सिरिंजची एमआरपी ५७.२० रुपये, तर २९.४१ रुपयांना खरेदी केलेल्या कॅथेटरची एमआरपी ३१० रुपये असल्याचे आढळले. जुलै महिन्यात मुंबई महानगर प्रदेश, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. सुमारे २० ते २५ रुग्णालयांच्या बिलांची तपासणी करताना काही वैद्यकीय साहित्यावर २०० ते ३०० टक्क्यांपर्यंत नफा आकारला जात असल्याचेही एफडीएच्या निदर्शनास आले.
रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि अन्य संबंधितांकडून वैद्यकीय साहित्याच्या अवाजवी दरांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हे सर्वेक्षण करण्यात आले. ऑक्सिजन मास्क, कॅथेटर, सिरिंज आणि रक्तसंचरण संच यांसारख्या साहित्याच्या खरेदी किमती व एमआरपीमध्ये मोठी तफावत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
---
अहवाल सादर
एफडीएने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल एनपीपीएकडे सादर केला; मात्र रुग्णालयांचे प्रवेश शुल्क किंवा उपचारांचे बिल नियंत्रित करण्याचा अधिकार एफडीएकडे नसून, त्यांची भूमिका संबंधित किंमत नियंत्रणाचा मुद्दा एनपीपीएच्या निदर्शनास आणून देण्यापुरती मर्यादित असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या प्रस्तावावर ‘एनपीपीए’कडून अद्याप निर्णय झालेला नाही.
---
अनेक वस्तू नियंत्रण कक्षाबाहेर
सध्या औषध किंमत नियंत्रण आदेश, २०१३ अंतर्गत काही औषधे व मोजकी वैद्यकीय उपकरणे नियंत्रित आहेत; मात्र बहुतांश वैद्यकीय साहित्य या चौकटीबाहेर आहे. त्यामुळे वारंवार आणि अत्यावश्यकपणे वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा या किंमत नियंत्रण व्यवस्थेत समावेश करण्याची मागणी एफडीएने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.