नेत्रदानातून पाच जणांना दृष्टी

नेत्रदानातून पाच जणांना दृष्टी
Published on

नेत्रदानातून पाच जणांना दृष्टी
डॉ. प्रशांत रसाळ यांच्या कुटुंबीयांचा अवयवदानाचा प्रेरणादायी निर्णय
पनवेल, ता. १६ (बातमीदार) : आईचे निधन झाल्यानंतर तिच्या आठवणी जपण्यासाठी अनेक जण विविध मार्गांचा अवलंब करतात, मात्र डॉ. प्रशांत रसाळ यांच्या कुटुंबीयांनी आईच्या डोळ्यांतून इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचा निर्णय घेतला. ८० वर्षीय शकुंतला रसाळ यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही डोळ्यांच्या बुबुळांचे दान करण्यात आले. आधुनिक नेत्र प्रत्यारोपण तंत्रज्ञानामुळे त्यातून पाच ते सहा गरजू व्यक्तींना दृष्टी मिळण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यातील गोडोली येथे ७ सप्टेंबरला पहाटे साडेतीनच्या सुमारास शकुंतला रसाळ यांचे निधन झाले. कुटुंबीयांनी नेत्रदानाचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या दोन तासांत सातारा जिल्हा आरोग्य विभागाचे पथक रुग्णालयात पोहोचले. आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही डोळ्यांच्या बुबुळांचे संकलन करण्यात आले. एका व्यक्तीच्या नेत्रदानातून एकापेक्षा अधिक गरजू व्यक्तींना दृष्टी मिळण्याची शक्यता असल्याने या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
डॉ. प्रशांत रसाळ यांनी पनवेलचे अतिरिक्त व प्रभारी आयुक्त म्हणूनही काम पाहिले असून, प्रशासकीय सेवेत त्यांना १९ वर्षांचा अनुभव आहे. राज्याच्या नगरविकास मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी सेवा बजावली आहे. पुसेगाव हे रसाळ कुटुंबीयांचे मूळ गाव असून, शिक्षक असलेल्या शकुंतला आणि दत्तात्रय रसाळ यांच्या संस्कारातून कुटुंब घडले.

आईचे नाव आणि विचारही जपले
शकुंतला रसाळ यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी नेत्रदानाचा निर्णय घेत त्यांच्या सामाजिक मूल्यांचा वारसा पुढे नेला. आईचे नाव अभिमानाने जपण्यासाठी डॉ. रसाळ यांनी प्रशासकीय कारकिर्दीतही वेगळी ओळख निर्माण केली आहे. राज्याच्या चौथ्या महिला धोरणानुसार शासकीय कागदपत्रांमध्ये आईचे नाव नोंदविण्याचा निर्णय झाल्यानंतर पनवेल महापालिकेतील त्यांच्या दालनाच्या पाटीवर ‘डॉ. प्रशांत शकुंतला दत्तात्रय रसाळ’ असे नाव नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे आईचे नाव स्वतःच्या नावासोबत जपतानाच तिच्या डोळ्यांतून इतरांच्या आयुष्यात प्रकाश पोहोचविण्याचा कुटुंबीयांचा निर्णय सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com