

मानवी जीवन अधिक सुखकर करणारा अभियंता हवा
म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांचे अभियंता दिन कार्यक्रमात प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : म्हाडा ही देशातील गृहनिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून, सर्वसामान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची संस्था आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या अभियांत्रिकी संस्थेतील अभियंत्यांचे नागरिकांप्रती असलेले उत्तरदायित्व अधिक महत्त्वाचे ठरते. “भविष्यातील अभियंता केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञान जाणणारा नसावा; तर तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी जीवन अधिक सुखकर करणारा संवेदनशील अभियंता असावा,” असे प्रतिपादन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी आज केले.
वांद्रे येथील सभागृहात भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभियंता दिन २०२६ या विशेष कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जयस्वाल बोलत होते. “म्हाडा ही केवळ घरे बांधणारी संस्था नसून लाखो कुटुंबांची स्वप्ने साकार करणारी आणि महाराष्ट्राच्या भविष्याचा पाया घालणारी देशातील अग्रगण्य गृहनिर्माण संस्था आहे. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना मानवी मूल्ये, संवेदनशीलता आणि गुणवत्तेची जपणूक हीच आपल्या कार्याची खरी ओळख असली पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही प्रगत झाली तरी मानवी विचारशक्ती, भावना आणि संवेदनशीलतेची जागा ती घेऊ शकणार नाही. कारण तंत्रज्ञान माहितीचे विश्लेषण करू शकते आणि निर्णय प्रक्रियेला गती देऊ शकते; मात्र माणूस विचार करण्यासोबतच अनुभवतो, संवेदना जाणतो आणि सहानुभूतीने निर्णय घेतो. त्यामुळे तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना मानवी मूल्ये जपणे हीच भविष्यातील खरी गरज असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, म्हाडाचे मुख्य अभियंता महेश जेसवानी, अनिल अंकलगी, धीरजकुमार पंदीरकर आदी उपस्थित होते.
म्हाडासाठी सात-आठ वर्षे महत्वाची
भविष्यातील गृहनिर्माण विकासात अभियंत्यांची भूमिका निर्णायक राहणार असून, पुढील सात ते आठ वर्षे म्हाडासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आव्हानात्मक असणार आहेत, असेही जयस्वाल यांनी नमूद केले. बदलत्या काळानुसार कार्यपद्धतीत आवश्यक बदल स्वीकारत आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण विचार आणि मानवी संवेदनशीलता यांचा समन्वय साधण्याचे आवाहन त्यांनी अभियंतावर्गाला केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.