बाल्या डान्सची परंपरा जपण्याची गरज

बाल्या डान्सची परंपरा जपण्याची गरज
Published on

बाल्या डान्सची परंपरा जपण्याची गरज
गणेशोत्सवात गावागावांत जाखडी नृत्याचे आयोजन
पोलादपूर, ता. १७ (बातमीदार) : गणेशोत्सव म्हटला की कोकणातील गावागावांत बाल्या डान्स अर्थात जाखडी नृत्याचा ठेका ऐकू येतो. गणेशोत्सवाच्या काळात वाड्या-वस्त्यांवर जाखडीच्या डबलबारीचे कार्यक्रम रंगतात. पोलादपूर तालुक्यातही यंदा विविध ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त बाल्या डान्सचे आयोजन करण्यात आले, मात्र सणापुरती मर्यादित राहिलेली ही लोककला काळाच्या ओघात मागे पडत असून, तिचे संवर्धन करण्याची गरज व्यक्त होत आहे.
जाखडी नृत्याला वैशिष्ट्यपूर्ण ठेका असून, ढोलकी, झांज, टाळ, घुंगरू आदी वाद्यांच्या साथीने कलाकार फेर धरून नृत्य करतात. काही सादरीकरणांमध्ये मानवी मनोरे उभारून विविध पक्षी-प्राण्यांच्या आकृती साकारल्या जातात. त्यानंतर गण, गवळण आणि काव्यात्मक जुगलबंदी सादर केली जाते. पायांच्या आणि हातांच्या लयबद्ध हालचाली, घुंगरांचा नाद आणि कलाकारांच्या आरोळ्यांमुळे सादरीकरणात रंगत येते.
कोकणातील अनेक घराणी आजही जाखडी नृत्याची परंपरा जपत आहेत. पूर्वी पारंपरिक वेशभूषा आणि घराण्याने रचलेली गाणी ही या कलेची वैशिष्ट्ये होती. बदलत्या काळानुसार वेशभूषा आणि गाण्यांच्या चालींमध्ये बदल झाले आहेत, मात्र घुंगरू बांधून पारंपरिक पद्धतीने नृत्य करणारे कलाकार कमी होत आहेत. त्यामुळे या लोककलेला शासनाच्या सांस्कृतिक विभागाने प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

तालुकास्तरीय स्पर्धांची गरज
जाखडी नृत्याला पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तालुका व जिल्हा स्तरावर स्पर्धांचे आयोजन करणे, कलाकारांना आर्थिक मदत देणे आणि पारंपरिक घराण्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. गणेशोत्सवापुरते कार्यक्रम न ठेवता वर्षभर या कलेच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध झाल्यास कलाकारांना प्रोत्साहन मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com