

मुंबईचे खरे राजे कोण?
मुंबईला अविरत सेवा देणाऱ्यांना गणेशोत्सवाच्या देखाव्यात मान
धारावी, ता. १७ (बातमीदार) : धारावीतील संत कक्कय्या मार्गावरील काळा किल्ला येथील श्री हनुमान सेवा मंडळाची १९६२ मध्ये स्थापना झाली. मंडळ यंदा ६४व्या वर्षात पदार्पण करीत असून, दरवर्षी समाजप्रबोधनपर देखाव्यांच्या माध्यमातून विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले जाते. यंदा ‘मुंबईचे खरे राजे कोण?’ या संकल्पनेतून मुंबईला अविरत सेवा देणाऱ्या विविध घटकांचा सन्मान करण्यात आला आहे.
या देखाव्यात मुंबईकरांना पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ‘जलदूत’ संबोधण्यात आले आहे. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी राबणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना ‘अंधारवेडे’, तर शहराला प्रकाशमान ठेवणाऱ्या ‘बेस्ट’सह अन्य वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘प्रकाशदूत’ अशी उपाधी देण्यात आली आहे.
मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा सुरळीत ठेवण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनाही या देखाव्यात स्थान देण्यात आले आहे. लाखो प्रवाशांना सुरक्षितपणे इच्छितस्थळी पोहोचविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे. कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना ‘देवतार’ म्हणून गौरवण्यात आले आहे.
मुंबईची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी २४ तास कार्यरत असलेल्या पोलिसांना ‘कर्दनकाळ’ अशी उपाधी देण्यात आली आहे. या विविध घटकांच्या माध्यमातून मुंबईच्या दैनंदिन जीवनाचा गाडा सुरळीत ठेवणारे खरे राजे कोण, हा प्रश्न देखाव्यातून उपस्थित करण्यात आला आहे. यंदा पर्यावरणपूरक शाडूची पाच फुटांची गणेशमूर्ती ‘धारावीचा किल्लेदार’ म्हणून विराजमान करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मंडळाला भेट देऊन देखावा आणि मांडलेल्या सामाजिक विषयाचे कौतुक केले. मंडळाचे अध्यक्ष चेतन थोरात, सचिव प्रमोद खडे व राहुल कोरडे, खजिनदार सोमनाथ आगवणे, गणेश खाडे आणि कार्याध्यक्ष नाना आगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.