

खोपटा येथील शिवगौराची ८५ वर्षांची परंपरा कायम
उत्सवाला भक्तिभावाने सुरुवात
उरण, ता. १७ (बातमीदार) ः तालुक्यातील खोपटा येथे शिवकृपा गौरामंडळाच्या वतीने गेल्या ८५ वर्षांपासून सुरू असलेली शिवगौरा उत्सवाची परंपरा यंदाही भक्तिभावाने जपण्यात आली आहे. ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिवशी शिवगौरा मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, शुक्रवारपासून (ता. १८) पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
गौरा म्हणजे भगवान शंकर, माता पार्वती आणि गणपती यांची एकत्रित मूर्ती मानली जाते. ज्येष्ठ गौरी आवाहनाच्या दिवशी शिवगौऱ्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा केली जाते. या उत्सवाची खोपटा परिसरात एक आगळीवेगळी परंपरा असून, उत्सवाच्या पहिल्या दिवशी महिलांना दर्शनासाठी प्रवेश दिला जात नाही. भगवान शंकराच्या नृत्यात बांगड्यांच्या आवाजामुळे व्यत्यय येऊ नये, अशी या परंपरेमागील श्रद्धा असल्याचे सांगितले जाते.
ही परंपरा जपण्यात शंकर पाटील, रामचंद्र पाटील, रामभाऊ भगत, रामजी पाटील, का. र. पाटील, गणपत पाटील, किसन भगत, रघुनाथ पोशा पाटील, कमलाकर पाटील, अनंत पाटील, मधुकर पाटील, व्ही. एस. पाटील, प्रकाश पाटील, रंगनाथ पाटील आणि नरेंद्र पाटील यांचे योगदान राहिले आहे. सध्या मंडळाचे अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष दिनकर पाटील, सचिव प्रशांत पाटील असून, खोपटा ग्रामस्थांचेही उत्सवासाठी सहकार्य लाभत आहे.
१९४१ पासून अखंड परंपरा
खोपटा येथील शिवगौरा उत्सवाला स्वातंत्र्यपूर्व काळात, १९४१ मध्ये सुरुवात झाली. खोपटा गावातील पाटील पाड्यातील पाटील व भगत कुटुंबीयांनी शिवगौरा मंडळाची स्थापना करून या उत्सवाला प्रारंभ केला. किसन गोवर भगत यांच्या घरामध्ये प्रथम शिवगौऱ्याच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. त्या काळात आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही मंडळाच्या सभासदांनी वर्गणी जमा करून उत्सव साजरा केला. उत्सवासाठी भातशेती करण्यात येत असे आणि त्यातून मिळणाऱ्या भाताच्या पिकातून मूर्तिकारांना मानधनाऐवजी धान्य दिले जात असल्याची माहिती सांगितली जाते.
धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल-
शिवगौराच्या मूर्तीसाठी आकर्षक मखर व डेकोरेशन करण्यात येते. शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या मूर्तीसोबत दरवर्षी वेगवेगळे पारंपरिक देखावे साकारले जातात. उत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि समाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो. विसर्जनाच्या दिवशी पारंपरिक शक्ती-तुऱ्याच्या नाचाचा जंगी सामना आयोजित केला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.