

स्वच्छतादूतांच्या हस्ते गणरायाची आरती
नितीन पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक
पनवेल, ता. १७ (बातमीदार) : खारघर सेक्टर २१ येथील शिवनेरी या महापौर निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती महापालिकेतील स्वच्छतादूतांच्या हस्ते करण्यात आली. महापालिकेच्या विविध खात्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना गणरायाची आरती करण्याची संधी देण्याच्या उपक्रम महापौर नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला. या वेळी गणरायाच्या चरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच पनवेल पालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छतादूतांच्या कार्याला बळ मिळावे, अशी प्रार्थनाही करण्यात आली.
महापालिकेच्या प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सवाच्या धार्मिक कार्यक्रमात सहभाग वाढावा तसेच अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी महापौरांना शुभेच्छा देताना नितीन पाटील यांनी या निवासस्थानी भरपूर वर्षे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या या शुभेच्छांमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. रामशेठ ठाकूर यांच्या शुभेच्छांकडे आगामी काळातील राजकीय घडामोडींच्या संदर्भातील संकेत म्हणून पाहिले जात आहे.
गणेशोत्सव हा सर्वांना एकत्र आणणारा उत्सव आहे. महापालिकेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छतादूतांना गणरायाची आरती करण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. स्वच्छतादूतांच्या हस्ते आरती झाल्याचा विशेष आनंद आहे. गणरायाने पनवेलकरांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांतता द्यावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे.
- नितीन पाटील, महापौर, पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.