

गणरायाच्या नैवेद्याला मोदकांचा गोडवा
पारंपरिक उकडीच्या मोदकांसह चॉकलेट, काजू, ड्रायफ्रूटला मागणी
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १६ : जिल्ह्यातील घराघरात गणेशमूर्तीची पूजाअर्चा सुरू असतानाच गणरायाच्या आवडत्या नैवेद्याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. त्यात मोदकाला असलेले विशेष महत्त्व लक्षात घेता मिठाईच्या दुकानांमध्ये विविध प्रकारच्या मोदकांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या चवींचे मोदक ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
गणेशोत्सव आणि मोदक हे जणू समीकरणच झाले आहे. त्यामुळे गणेशभक्तांकडून यंदाही पारंपरिक उकडीच्या मोदकांना मोठी पसंती मिळत आहे. त्याचबरोबर बदलत्या आवडीनिवडीनुसार मावा, काजू, केशर, ड्रायफ्रूट, चॉकलेट, गुलकंद, पिस्ता अशा विविध प्रकारच्या मोदकांची मागणीही वाढली असल्याचे समर्थ स्वीटमार्टचे मालक भारत शर्मा यांनी सांगितले. काही मिठाई विक्रेत्यांकडून ग्राहकांच्या मागणीनुसार विशेष सजावटीचे मोदकही तयार करून दिले जात आहेत. पूर्वी गणेशोत्सवात घरगुती पद्धतीने तयार केलेल्या उकडीच्या मोदकांना सर्वाधिक पसंती मिळत असे. मात्र, गेल्या काही वर्षांत ग्राहकांच्या आवडीत बदल झाला आहे. पारंपरिक मोदकांसोबत मावा, काजू, बदाम, पिस्ता, केशर, चॉकलेट आणि ड्रायफ्रूटच्या मोदकांना तरुणाईकडून विशेष मागणी होत आहे. मुलांसाठी चॉकलेट मोदक, तर ज्येष्ठांसाठी पारंपरिक किंवा कमी गोडीचे मोदक खरेदी केले जात असल्याचे ए वन मिठाईवाले सागर दास यांचे मत आहे.
एकाच पॅकमध्ये विविध चवी
एकाच प्रकारचे मोदक घेण्याऐवजी विविध चवींचा आस्वाद घेण्यासाठी मिश्र पॅक खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा कल वाढला आहे. एका पॅकमध्ये वेगवेगळ्या चवी आणि रंगांचे मोदक उपलब्ध करून दिले जात असल्याने ते नैवेद्यासोबतच पाहुण्यांच्या स्वागतासाठीही पसंत केले जात आहेत. आकर्षक पॅकिंगमुळे भेटवस्तू म्हणूनही मोदक देण्याचा ट्रेंड वाढत आहे.
दरवाढीचा किंचित परिणाम
यंदा मोदकांच्या दरात काही प्रमाणात वाढ झाल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे. कच्चा माल, ड्रायफ्रूट, दूधजन्य पदार्थ आणि अन्य साहित्याच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम मोदकांच्या दरावर झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. साध्या मोदकांपासून प्रीमियम दर्जाच्या ड्रायफ्रूट आणि चॉकलेट मोदकांपर्यंत दरात तफावत आहे. मात्र, गणेशोत्सवाचा आनंद आणि नैवेद्याला असलेले धार्मिक व भावनिक महत्त्व पाहता या दरवाढीचा खरेदीच्या उत्साहावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही.
घरगुती मोदकांनाही मागणी
मिठाईच्या दुकानांबरोबरच घरगुती पद्धतीने मोदक तयार करून देणाऱ्या महिला, बचत गट आणि गृहोद्योगांनाही गणेशोत्सवात चांगली मागणी आहे. घरच्या चवीचा, ताजा आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेला मोदक मिळत असल्याने अनेक कुटुंबांकडून घरगुती मोदकांना प्राधान्य दिले जात आहे. काही महिला बचत गटांकडून पारंपरिक उकडीच्या मोदकांसोबत विविध चवींचे मोदक तयार करून विक्री केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.