

आरोग्य यंत्रणेचे ऑडिट होणार
नवी मुंबई महापालिकेत आरोग्य व्यवस्थेचा खेळखंडोबा
मुदतबाह्य सलाईनने बळी गेल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय चौगुले आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ : पालिकेच्या रुग्णालयांमध्ये सुरू असलेला नागरिकांच्या जीवाशी खेळ आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच तापला. वाशी महापालिका रुग्णालयात मुदतबाह्य सलाईन दिल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी सत्ताधारी आणि प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले. फक्त कनिष्ठ परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवून मूळ जबाबदार अधिकाऱ्यांना का वाचवले जात आहे, असा जाब विचारत चौगुले यांनी पालिकेच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे काढले. तसेच, चौकशीचा सविस्तर अहवाल सभेपुढे सादर करून खऱ्या यंत्रणेतील गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली.
लक्षवेधी सूचनेद्वारे महासभेत हा विषय उपस्थित करताना विजय चौगुले यांनी प्रशासकीय उत्तरदायित्वावर बोट ठेवले. ते म्हणाले, पालिकेच्या रुग्णालयांत शहरातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या अपेक्षेने उपचारासाठी येतात; मात्र आपली आरोग्य व्यवस्थाच आज आयसीयूच्या जीवावर आणि उधारावर चालली आहे. दर महिन्याला आरोग्य विभागाची एखादी गंभीर चूक समोर येते. औषध पुरवठ्याचे डिजिटल ऑडिट का नाही, असा प्रश्न चौगुले यांनी उपस्थित केला. केंद्रीय औषध भांडारातून विविध वॉर्डांमध्ये औषधे आणि सलाईन जाताना त्यांची मुदतीची तारीख तपासण्याची कोणतीही डिजिटल प्रणाली महापालिकेत का नाही, तीन ते सहा महिन्यांपूर्वी औषध वॉर्डात पाठवणाऱ्या फार्मासिस्ट आणि संगणक ऑपरेटरला निलंबित करून प्रशासन काय साध्य करीत आहे, ऐरोलीच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात गरोदर महिलेचा मृत्यू झाला, तेव्हा प्रशासनाने वैद्यकीय निष्काळजी नसल्याचा दावा करीत कोणतीही मदत दिली नाही; मात्र वाशीत मुदतबाह्य सलाईनने मृत्यू झाल्यावर १० लाखांची मदत जाहीर केली आणि दोन परिचारिकांना निलंबित केले, हा दुजाभाव नाही का, असे प्रश्न चौगुले यांनी विचारले. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मान्यता नसलेली किंवा बनावट औषधे तर येत नाहीत ना, याची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी चौगुले यांनी सभागृहापुढे केली.
फार्मासिस्टच्या निलंबनावरून सभागृहात संताप!
नगरसेवक शिवराम पाटील यांनीदेखील प्रशासकीय कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला. दीपक नलावडे या फार्मासिस्टने २६ एप्रिल रोजी औषधे स्टोअरमधून दिली, याची मुदत जुलैपर्यंत होती. तीन महिन्यांनंतर वॉर्डातील परिचारिकेने ते सलाईन लावताना मुदत न पाहिल्याने ही दुर्घटना घडली. मग, तीन महिन्यांपूर्वी औषध देणाऱ्या फार्मासिस्टचा यात काय दोष? आयुक्तांनी स्वतःची जबाबदारी झटकून केबिनमध्ये बसून निष्पापांना निलंबित केले आहे, असा गंभीर आरोप पाटील यांनी केला.
प्रशासनाचा आणि सत्ताधाऱ्यांचा बचाव
सभागृह नेते सागर नाईक यांनी या घटनेवर बोलताना, हा यंत्रणेचा दोष नसून मानवी चूक आहे. ज्या परिचारिकेने लेबल्स न बघता सलाईन लावले, तिच्यावर महापौरांनी तत्काळ निलंबनाची कारवाई केली, असे सांगत कारवाईचे समर्थन केले. चुकीला माफी नाही. तसेच, ज्यांचा दोष नाही, त्यांना सुधारित चौकशी अहवाल सभेपुढे आल्यावर कारवाई मागे घेऊ, असे आश्वासन दिले.
मुदतबाह्य सलाईनमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणात दोन परिचारिका आणि एक फार्मासिस्टला निलंबित केले असून अतिरिक्त आयुक्त-२ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. पुढील सात दिवसांत याचा सविस्तर चौकशी अहवाल महासभेसमोर ठेवला जाईल आणि दोषी अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल.
- डॉ. राहुल गेठे, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका
महापालिका प्रशासन आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करीत असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी एसओपी आणि औषध सुरक्षेबाबतचे अहवाल पुढील महासभेत सादर केले जातील. तसेच याआधीदेखील आरोग्य विभागाबाबत चर्चा झाली आहे.
- सुजाता पाटील, महापौर
नगरविकास विभागावर तुतू-मैंमैं!
सर्वसाधारण सभेत आरोग्य विषयावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राज्य सरकारच्या नगरविकास विभाग आणि शौचालयांच्या चर्चेवरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. सभागृह नेते सागर नाईक म्हणाले, की आम्हाला अभिमान आहे की आम्ही महापालिकेत शौचालयांसारख्या मूलभूत सुविधांवर दोन दिवस चर्चा करतो. गेल्या सहा वर्षांत नगरविकास विभागाने शहरातील लोकांच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष दिले नाही, असा आरोप केला. यावर विजय चौगुले आक्रमक झाले व त्यांनी पलटवार केला. लक्षवेधी आरोग्य आणि मुदतबाह्य सलाईनबद्दल होती, मग यात नगरविकास विभागाचा विषय आलाच कुठून? हॉस्पिटलमध्ये काय यूडी विभाग चालवते का? २५ वर्षे अवॉर्ड घेणाऱ्या महापालिकेला आज शौचालयांवर दोन-दोन दिवस चर्चा करावी लागत असेल, तर ही लाजिरवाणी बाब आहे. अखेर महापौर सुजाता पाटील यांनी मध्यस्थी करीत वातावरण शांत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.