

मुरूडमध्ये भातपीक बहरले
हवामान पोषक राहिल्याने उत्पादनात वाढीची अपेक्षा
मुरूड, ता. १८ (बातमीदार) : मुरूड तालुक्यात यंदा पावसाने सुरुवातीला ओढ दिल्याने भातलागवडीला विलंब झाला, मात्र त्यानंतर झालेला पाऊस आणि सध्याचे अनुकूल हवामान यामुळे बहुतांश भागातील भातपीक बहरले आहे. तालुक्यात सुमारे ३२०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. जया, सुवर्णा, रूपाली, शुभांगी, चिंटू आणि वाडा कोलम या वाणांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पाणथळ व खार जमिनीत पनवेल-१, २ आणि ३ या वाणांची लागवड केली जाते. सध्या जया वाणाची वाढ चांगली झाली असून, सुवर्णासह इतर वाणांना बहर येण्यास आणखी सुमारे १५ दिवस लागण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाकडून नवीन वाण तसेच आधुनिक लागवड पद्धतींचा प्रसार करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. कार्यशाळा, चर्चासत्रे, क्षेत्रभेटी आणि परिसंवादाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. भाताचे हळवे वाण ९५ ते ११० दिवसांत, निमगरवे वाण ११० ते १३० दिवसांत, तर गरवे वाण १३० ते १४५ दिवसांत तयार होते. यंदा सूर्यप्रकाश आणि हवामान पोषक असल्याने खोडकिडीचे प्रमाण कमी असून, उत्पादन चांगले मिळण्याचा अंदाज कृषी मित्र उल्हास वारगे यांनी व्यक्त केला.
मागील हंगामातील उत्पादनाचे चित्र
महाराष्ट्र कृषी विभागाच्या तालुकानिहाय पीक कापणी प्रयोगाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार मुरूडची भात उत्पादकता विविध वर्षांत बदलत राहिली आहे. उपलब्ध नोंदींमध्ये मुरूडसाठी २,९९१.५, २,८०५.२, ३,०६६.६, २,४०४.१ आणि २,०९५.६ किलो प्रतिहेक्टर अशी उत्पादकता नोंदवली आहे. त्यामुळे यंदाच्या पोषक हवामानाचा प्रत्यक्ष उत्पादनावर काय परिणाम होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.