

गणेशोत्सवात भक्तीला पर्यावरणाची जोड!
सहा विसर्जन स्थळांवर निर्माल्यापासून खतनिर्मितीचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ : श्रींच्या चरणी अर्पण केलेल्या निर्माल्याचे पावित्र्य जपत त्यापासून वृक्षराजीसाठी उत्तम खतनिर्मिती करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम आकारास आला आहे. महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा, अलिबाग) यांच्या श्री सदस्यांनी विसर्जन स्थळांवर निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याचा विडा उचलला आहे.
दिवाळे जेट्टी, बेलापूर गाव तलाव, नेरूळ गाव तलाव, चिंचोली तलाव, शिरवणे, धारण तलाव सेक्टर १९ (कोपरखैरणे), ऐरोली खाडी तलाव व रबाळे तलाव शहरातील सहा महत्त्वाच्या विसर्जन ठिकाणी दीड दिवसाच्या श्री विसर्जनापासूनच प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्याचे वर्गीकरण करून संकलन केले जात आहे. संकलित केलेल्या ओल्या निर्माल्यातून फुलांच्या पाकळ्या वेगळ्या केल्या जात आहेत. कोपरखैरणे धारण तलावाजवळील उद्यान आणि ऐरोली खाडी तलावाजवळील उद्यानात खास तयार करण्यात आलेल्या कंपोस्ट पीटमध्ये या पाकळ्या टाकून त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाईल. हे खत शहरातील झाडे आणि उद्याने फुलवण्यासाठी वापरले जाणार आहे.
दीड दिवसात तब्बल १,४८५ किलो निर्माल्याचे संकलन
प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी दीड दिवसाच्या विसर्जनप्रसंगी सहा ठिकाणांवरून एकूण १,४८५ किलो निर्माल्य गोळा केले आहे.
ऐरोली : ४५० किलो
कोपरखैरणे : ३२० किलो
नेरूळ : २३० किलो
शिरवणे : २०० किलो
बेलापूर : १७५ किलो
दिवाळे : ११० किलो
स्वच्छ भारत अभियानाला नवा आयाम
महाराष्ट्रभूषण पद्मश्री डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. श्री सचिन धर्माधिकारी यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाखाली साकारणारा हा उपक्रम गणेशोत्सवातील सर्वच विसर्जनांच्या दिवशी राबविला जाणार आहे. धार्मिक भावना जपत पर्यावरणाचे रक्षण करणारा आणि स्वच्छ भारत अभियानाला नवा आयाम देणारा हा उपक्रम ठरला आहे. या सामाजिक आणि पर्यावरणपूरक योगदानाबद्दल महापौर सुजाता पाटील, आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सर्व श्री सदस्यांचे कौतुक केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.