

गणेशोत्सवाने नवी मुंबई उजळली
भक्तीबरोबरच सामाजिक संदेश; बेलापूर ते दिघ्यापर्यंत उत्साहाचे वातावरण
तुर्भे, ता. १८ (बातमीदार) : लाडक्या गणरायाच्या १० दिवसांच्या उत्सवाला सुरुवात झाल्याने नवी मुंबईत सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. घराघरात विराजमान झालेल्या गणरायाच्या आरत्या, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आकर्षक सजावटी, देखावे आणि विद्युत रोषणाईने शहर उजळून निघाले आहे. बेलापूरपासून नेरूळ, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली ते दिघ्यापर्यंत विविध भागांत ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष ऐकू येत आहे.
गणेशमूर्तींच्या प्रतिष्ठापनेनंतर उत्सवाला चांगलीच रंगत आली आहे. सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या आरत्या, भजन-कीर्तन तसेच मंडळांकडून आयोजित धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वातावरण भक्तिमय झाले आहे. फुलांची आरास, आकर्षक मखरे, विद्युत तोरणे आणि विविध प्रकाशयोजनांनी गणेश मंडप सजले आहेत. रात्रीच्या वेळी या रोषणाईमुळे शहराचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.
सामाजिक संदेश देणारे देखावे
यंदा अनेक गणेशोत्सव मंडळांनी केवळ सजावट आणि भव्यतेपेक्षा सामाजिक विषयांवर आधारित देखावे साकारण्यावर भर दिला आहे. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, पाणी बचत, प्रदूषणमुक्ती, सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देणारे देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवातून धार्मिकतेसोबतच सामाजिक जनजागृतीही केली जात आहे.
सायंकाळच्या वेळी गणेशदर्शनासाठी नागरिकांची गर्दी होत असून, कुटुंबासह दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांमुळे मंडप परिसर आणि प्रमुख रस्त्यांवर चैतन्याचे वातावरण आहे. अनेक मंडळांनी भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार, स्वयंसेवक आणि दर्शनासाठी शिस्तबद्ध व्यवस्था केली आहे. दरम्यान, विद्युत सजावट करताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कृत्रिम तलावांची व्यवस्था
गणेश विसर्जनासाठी नवी मुंबई महापालिकेने विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे भाविकांना जवळच्या ठिकाणी विसर्जनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. पुढील काही दिवस शहरात धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रम, जनजागृती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.