

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : बाळाच्या जन्मानंतर अवघ्या काही दिवसांतच ३५ वर्षीय महिलेच्या आयुष्यावर संकटांची मालिकाच कोसळली. एकाच वेळी अनेक संकटांशी झुंज देणाऱ्या नाझिया यांच्यासाठी पुढील ५० दिवस म्हणजे अक्षरशः जगण्याची लढाई ठरली. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी अथक उपचार करत अखेर त्यांना या संकटातून बाहेर काढले.
नाझिया यांना ४ जुलैला तातडीच्या प्रसूती शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीनंतर प्रकृती स्थिर असल्याने पाचव्या दिवशी त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र, काही दिवसांतच प्रकृती बिघडली. नवव्या दिवशी तीव्र ताप आल्यानंतर पुन्हा तपासणी करण्यात आली. शस्त्रक्रियेची जखम उघडल्याचे आणि संसर्ग झाल्याचे स्पष्ट होताच त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच नाझिया यांना अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले. रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर गेली होती. डेंगीची लागण झाली होती. त्यात औषधांना सहज प्रतिसाद न देणारा एमआरएसए संसर्ग जखमेपर्यंत पोहोचला होता. थायरॉईडचा त्रास आणि फुफ्फुसात पाणी साचल्याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली.
डॉक्टरांसमोर प्रत्येक आजारावर स्वतंत्रपणे उपचार करण्याबरोबरच त्यांचा एकत्रित परिणाम नियंत्रित करण्याचे आव्हान होते. प्रभावी प्रतिजैविके देण्यात आली. इन्सुलिनच्या साह्याने मधुमेह नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. प्रकृतीतील प्रत्येक बदलावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी सातत्याने वैद्यकीय देखरेख ठेवण्यात आली. जखम गंभीर असल्याने ती भरून आणणे हे सर्वांत मोठे आव्हान ठरले. सलग २५ दिवस दिवसातून तीन वेळा मलमपट्टी करण्यात आली. तरीही जखम लवकर भरून यावी यासाठी पुढे ‘व्हॅक्यूम ड्रेसिंग’ या आधुनिक उपचारपद्धतीचा वापर करण्यात आला. उपचारांना प्रतिसाद मिळाल्यानंतर पुन्हा शस्त्रक्रिया करून जखमेवर टाके घालण्यात आले.
दरम्यान, प्रदीर्घ उपचारांमुळे नाझिया मानसिकदृष्ट्याही खचल्या. काही वेळा त्यांनी उपचार सोडून घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, डॉक्टरांच्या पथकाने केवळ औषधोपचार न करता त्यांचे सातत्याने समुपदेशन करून मानसिक आधार दिला. उपचार पूर्ण होईपर्यंत धीर सोडू नये, यासाठी त्यांना विश्वास दिला. घरी जाण्यापूर्वी नाझिया यांनी अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांची भेट घेऊन संपूर्ण वैद्यकीय पथकाचे आभार मानले. त्यांनी रुग्णालयाला आभाराचे पत्रही दिले.
रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी रुग्णांशी सौजन्याने वागतात. नाझिया यांच्या उपचारातून रुग्णालयाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली असून, या कामाचा रास्त अभिमान आहे.
- डॉ. स्वप्नाली कदम, अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.