

निर्माल्य संकलनासाठी पाच निर्माल्यरथ
विसर्जनस्थळी स्वतंत्र कलश; महापालिकेचा पर्यावरणपूरक उपक्रम
पनवेल, ता. १८ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या काळात निर्माण होणारे निर्माल्य पाण्यात विसर्जित होऊ नये, यासाठी पनवेल महापालिकेने विशेष व्यवस्था केली आहे. ‘उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा’ या उपक्रमांतर्गत गणेशमूर्ती विसर्जनस्थळी स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. तसेच घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून निर्माल्य संकलित करण्यासाठी पाच विशेष निर्माल्यरथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली १० दिवस हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरातील विविध विसर्जनस्थळी फुलांचे हार, फुले, दुर्वा, शमी तसेच सजावटीचे साहित्य जमा करण्यासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करणे शक्य होणार आहे.
महापालिकेच्या चारही प्रभागांसह नावडे उपविभागासाठी प्रत्येकी एक, असे एकूण पाच निर्माल्यरथ ठेवण्यात आले आहेत. हे रथ विविध भागांतून निर्माल्य संकलित करून प्रक्रिया केंद्रांपर्यंत पोहोचविणार आहेत. उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सूचनेनुसार स्वच्छता विभागाने या उपक्रमाचे नियोजन केले आहे. नागरिकांनी निर्माल्य कचऱ्यात न टाकता महापालिकेच्या निर्माल्य कलशात किंवा निर्माल्यरथात जमा करावे, असे आवाहन मुख्य स्वच्छता निरीक्षक अरुण कांबळे यांनी केले आहे.
निर्माल्यावर प्रक्रिया
घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत संकलित केलेल्या निर्माल्यावर पर्यावरणपूरक पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात जमा होणारे फुलांचे हार, फुले, दुर्वा, शमी आणि अन्य सेंद्रिय साहित्य पाण्यात किंवा नियमित कचऱ्यात मिसळल्यास त्याची योग्य विल्हेवाट लावणे कठीण होते. त्यामुळे निर्माल्याचे स्वतंत्र संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे विसर्जनस्थळांची स्वच्छता राखण्यासोबतच जलप्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे. नागरिकांनीही निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करून या पर्यावरणपूरक उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.