‘ऑस्कर’च्या शर्यतीत ‘गाेंधळ’

‘ऑस्कर’च्या शर्यतीत ‘गाेंधळ’
Published on

‘ऑस्कर’च्या शर्यतीत ‘गाेंधळ’
मराठी चित्रपटाचा पुन्हा सातासमुद्रापार डंका
मराठी सिनेमाला
मुंबई, ता. १८ : महाराष्ट्राच्या लोककला, श्रद्धा आणि बदलत्या सामाजिक जाणिवांचा वेध घेणाऱ्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाने ऑस्करच्या शर्यतीत दमदार प्रवेश केला आहे. ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी या चित्रपटाची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ श्रेणीत तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे, अशी घाेषणा फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने केली आहे. तब्बल ११ वर्षांनंतर मराठी चित्रपटाला हा मान मिळाला आहे. यापूर्वी २०१५ मध्ये ‘कोर्ट’ या चित्रपटाला हा सन्मान मिळाला हाेता.

भारताच्या अधिकृत ऑस्कर प्रवेशिकेसाठी विविध भाषांतील अनेक चित्रपट शर्यतीत होते. त्यामध्ये ‘डोरोथी’, ‘बालन’, ‘बायसन’, ‘अंग’, ‘मैं वापस आऊंगा’, ‘धुरंधर १’, ‘धुरंधर २’, ‘इक्कीस’, ‘बॉर्डर २’, ‘देऊळ बंद २’, ‘हनुमान अंश’ आणि ‘द शेप ऑफ मोमो’ या चित्रपटांचा समावेश होता. लेखक व दिग्दर्शक संतोष डावखर यांनी दिग्दर्शित केलेला आणि डावखर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात वधुवराच्या आयुष्यातील विघ्ने दूर करण्यासाठी केला जाणारा पारंपरिक ‘गोंधळ’ हा या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. या पार्श्वभूमीवर मानवी भावना, अंधश्रद्धा आणि बदलत्या सामाजिक दृष्टिकोनांचाही वेध घेण्यात आला आहे. हा चित्रपट १४ नोव्हेंबर २०२५ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, माधवी जुवेकर, सुरेश विश्वकर्मा, कैलाश वाघमारे, अनुज प्रभू, ऐश्वर्या शिंदे, पूनम पाटील, विठ्ठल काळे आणि प्रवीण डाळिंबकर अशा अनेक मातब्बर कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. यापूर्वी मराठीतून ‘श्वास’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि ‘कोर्ट’ हे चित्रपट ऑस्करसाठी गेले होते.
----
पाच भाषांत प्रदर्शित करण्याची तयारी
अनेक चित्रपटांनी चित्रपटगृहांत आणि बॉक्स ऑफिसवर या वर्षी विक्रम प्रस्थापित केले. त्यातून ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाली. ऑस्करसाठी ‘गोंधळ’चे आंतरराष्ट्रीय अभियान लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी नियोजनबद्ध रोडमॅप तयार करण्यात आला आहे. हा चित्रपट पाच भारतीय भाषांत प्रदर्शित करण्याची तयारी असून, जागतिक प्रदर्शनाचेही नियोजन करण्यात आले आहे. भारतातील आणि परदेशातील प्रदर्शनाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.
-----
‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका ठरला. भारतात इतक्या भाषा बोलल्या जातात आणि प्रत्येक भाषेत असंख्य चित्रपट तयार होतात. यातून मराठी चित्रपटाची निवड होणे, ही खूप मोठी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. आपल्या मातीतल्या लोककलेतून आपण ऑस्करपर्यंत पोहोचलो आहोत, हीच या प्रवासातील सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बाब आहे.
- किशोर कदम, ज्येष्‍ठ अभिनेते
-----
‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका ठरल्याचा आनंद आहेच; पण माझ्यासाठी हा आनंद द्विगुणित आहे. कवयित्री म्हणून माझा एक लघुपट ‘कवी’ ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झाला होता. तो अमेरिकेतून गेला होता. या वेळी मराठी चित्रपट भारतातून ऑस्करच्या शर्यतीत उतरतोय, ही भावना खूप अभिमानाची आहे.
- माधवी जुवेकर, अभिनेत्री

--------
गोंधळ चित्रपटाची ऑस्करमध्ये निवड करण्यात आली. त्यामुळे खूप अभिमान वाटतोय संपूर्ण ‘गोंधळ’च्या टीमला. आपला मराठी चित्रपट सातासमुद्रापार ऑस्करवारी करणार आहे. हा महाराष्ट्रासाठीदेखील अभिमानाचा क्षण आहे. पुढचे सहा महिने आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत.
- संतोष डावखर, दिग्दर्शक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com