

भारताचा विकासदर सात टक्क्यांवर
‘मूडीज’चा अंदाज; ‘जीडीपी’ अंदाजात सुधारणा
नवी दिल्ली, ता. १८ : मूडीज रेटिंग्ज या जागतिक पतमानांकन संस्थेने भारताच्या आर्थिक विकासाबाबतचा अंदाज वाढवून आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी सात टक्के केला आहे. हा अंदाज आधीच्या सहा टक्क्यांपेक्षा एक टक्का अधिक आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक धक्क्यांनंतरही भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता कायम राहिल्याने हा बदल करण्यात आल्याचे मूडीजने म्हटले आहे. भारताचा विकासदर सर्व जी-२० अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक राहण्याची अपेक्षाही मूडीजने व्यक्त केली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने विकासदर ६.७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तर एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने ६.६ टक्के, फिच रेटिंग्जने ६.४ टक्के अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताचा जीडीपी ७.८ टक्क्यांनी वाढला होता, मात्र वाढत्या कच्च्या तेलाच्या भावामुळे महागाईचा धोका वाढू शकतो, असा इशारा मूडीजने दिला आहे. तेलाचा भाव या महिन्यात प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर गेला आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील सरासरी महागाईचा दर मूडीजच्या ४.८ टक्के अंदाजापेक्षा अधिक राहू शकतो. ‘एल निनो’मुळे अन्नधान्याच्या भावावरही दबाव वाढण्याची शक्यता आहे. भारताकडे मोठा परकी चलनसाठा, कच्च्या तेलाच्या आयातीचे विविध स्रोत आणि मजबूत देशांतर्गत मागणी हे महत्त्वाचे आधार आहेत, मात्र ऊर्जा व खतांच्या आयातीवरील वाढता खर्च, बाह्य मागणीतील नरमाई आणि पश्चिम आशियातून होणाऱ्या पुरवठ्यात घट झाल्यास चालू खात्यातील तूट वाढू शकते, असेही मूडीजने म्हटले आहे.
पतमानांकन आणि स्थिर दृष्टिकोन कायम
मूडीजने भारताचे ‘बीएएथ्री’ हे सार्वभौम पतमानांकन आणि ‘स्थिर’ दृष्टिकोन कायम ठेवला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, जपानची क्रेडिट रेटिंग एजन्सी जेसीआरने भारताचे सार्वभौम रेटिंग ‘ए-’पर्यंत सुधारले होते, तर एस अँड पी आणि फिच या रेटिंग्ज संस्था यांनी धोरणात्मक स्थिरता आणि पायाभूत सुविधांमधील उच्च गुंतवणुकीसह गतिमान आणि वेगाने वाढणारी मजबूत अर्थव्यवस्था असल्याचे कारण देत, भारताचे मानांकन ‘बीबीबी’ आणि ‘बीबीबी-’ वर कायम ठेवले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.