

तृतीयपंथींच्या गणेशोत्सवाला चार दशकांची परंपरा
कोपरी गावात १९८६ पासून उत्सव; यंदा ४० व्या वर्षातही उत्साह कायम
तुर्भे, ता. २० (बातमीदार) : १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचा उत्सव जात, धर्म, वर्ण किंवा लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन सर्वत्र भक्तिभावाने साजरा केला जातो. याच सामाजिक समतेचे आणि बंधुभावाचे एक अनोखे दर्शन वाशीतील कोपरी गावात पाहायला मिळत आहे. येथील तृतीयपंथी समाजाच्या गणेशोत्सवाला यंदा तब्बल चार दशके पूर्ण झाली असून, १९८६ मध्ये सुरू झालेली ही परंपरा आजही त्याच उत्साहाने आणि भक्तिभावाने अविरत सुरू आहे.
कोपरी गावातील भवानी मंदिरात ‘जय अंबे सार्वजनिक उत्सव मंडळा’च्या माध्यमातून १९८६ मध्ये मंडळाच्या तत्कालीन अध्यक्षा शांताबाई पुजारी यांनी या उत्सवाची सुरुवात केली. सुरुवातीला मर्यादित स्वरूपात सुरू झालेला हा उत्सव पुढे तृतीयपंथी समाजासाठी एकत्र येण्याचे आणि आपली धार्मिक-सांस्कृतिक परंपरा जपण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ ठरला. गणरायावरील श्रद्धेमुळे दरवर्षी तृतीयपंथीय समाजातील सदस्य एकत्र येऊन बाप्पाची विधिवत प्रतिष्ठापना करतात. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत भवानी मंदिर परिसरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
मध्य रेल्वे मार्गावरील तृतीयपंथींची उपस्थिती
या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुंबई आणि ठाणे परिसरातील विविध भागांतून तृतीयपंथी समाजातील सदस्य येथे सहभागी होतात. गोवंडी, मानखुर्द, घाटकोपर, मुलुंड, भांडुप, ठाणे, कल्याण आदी भागांतून अनेक जण गणेशोत्सवासाठी कोपरी गावात येतात. त्यामुळे या उत्सवाला दरवर्षी व्यापक स्वरूप प्राप्त होते. अनेक वर्षांपासून एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या समाजातील सदस्यांसाठी हा उत्सव स्नेहमेळावाही ठरतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.