गणेशोत्सवाच्या आठवणी डिजिटल

गणेशोत्सवाच्या आठवणी डिजिटल
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये भक्तिभावाने साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आठवणी, परंपरा आणि वैशिष्ट्यपूर्ण क्षण आता डिजिटल स्वरूपात जतन करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकाराने सुरू केलेल्या ‘बाप्पा डॉट ऑर्ग’ या डिजिटल व्यासपीठावर ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकजीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. घरगुती गणपतीची सजावट, पारंपरिक पूजा-पद्धती, सार्वजनिक मंडळांचे देखावे, सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक संदेश; तसेच गणरायाशी जोडलेल्या कौटुंबिक आठवणींना या उपक्रमातून डिजिटल स्वरूपात स्थान मिळणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी ‘बाप्पा डॉट ऑर्ग’ या व्यासपीठावर नोंदणी करून गणेशोत्सवाशी संबंधित एक छायाचित्र आणि त्यामागची कथा, परंपरा किंवा आठवण नोंदवायची आहे. नोंदणी यशस्वी झाल्यानंतर सहभागी नागरिकांना अधिकृत सहभाग प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून जपला जाणारा ठाणे जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आपल्या बाप्पाशी जोडलेली एखादी आठवण, छायाचित्र किंवा परंपरा डिजिटल स्वरूपात नोंदवून या उपक्रमात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे.

गावागावांतील परंपरा
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गणेशोत्सवाशी निगडित असलेल्या विविध स्थानिक परंपरा, लोककला, सजावट आणि सामाजिक उपक्रमांची माहिती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. ग्रामपंचायत स्तरावर या उपक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून अधिकाधिक सहभाग नोंदविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाशी जोडलेला उत्सव आहे. प्रत्येक कुटुंब, गाव आणि परिसराची गणेशोत्सव साजरा करण्याची स्वतंत्र परंपरा आणि त्याच्याशी निगडित आठवणी आहेत. या आठवणी पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याची संधी ‘बाप्पा डॉट ऑर्ग’च्या माध्यमातून मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपली छायाचित्रे, कथा आणि परंपरा डिजिटल स्वरूपात नोंदवाव्यात.
- रणजित यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद
.............................
ग्रामपंचायत स्तरावर या उपक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण सजावट, सामाजिक संदेश देणारे उपक्रम, पारंपरिक पद्धती आणि गणरायाशी संबंधित आठवणी नागरिकांनी या डिजिटल व्यासपीठावर नोंदवाव्यात.
- प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), ठाणे जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com