मोरबेच्या निळ्याशार जलाशयाकाठी फुलणार ३३ हजार बांबूंचे ''हिरवे नंदनवन''!

मोरबेच्या निळ्याशार जलाशयाकाठी फुलणार ३३ हजार बांबूंचे ''हिरवे नंदनवन''!
Published on

मोरबेच्या काठी फुलणार बांबूंचे हिरवे ‘नंदनवन’!
पक्षी, फुलपाखरांचा नवा आशियाना आणि शुद्ध ऑक्सिजनचा खजिना
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २० : नवी मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या मोरबे धरण परिसराचा कायापालट आता एका निसर्गरम्य ‘ऑक्सिजन पार्क’मध्ये होणार आहे. मोरबे धरणाच्या तटबंदीला लागून लवकरच ३३ हजार बांबूंची झाडे बहरताना दिसणार असून, पक्ष्यांचा किलबिलाट, फुलपाखरांचे थवे आणि शुद्ध हवेच्या झुळुकीसह हे क्षेत्र पर्यावरणाला एक नवी संजीवनी देणारे ठरेल.
बांबू हे केवळ एक झाड नाही, तर ते निसर्गाचे एक उत्तम एअर-फिल्टर मानले जाते. मोरबे धरणाच्या भिंतीलगत लावलेल्या ३३ हजार बांबूच्या रोपांचे पुढील तीन वर्षे जतन, संगोपन आणि संरक्षण करण्याचा एक महत्त्वाकांक्षी आराखडा महापालिकेच्या उद्यान विभागाने आखला आहे. आयुक्तांच्या सूचनेनुसार संवर्धन व देखभालीसाठी एक कोटी ६६ लाख ३२ हजारांचा निधी प्रस्तावित केला आहे. मोरबे धरण क्षेत्रातील या हिरव्या संपदेचे रक्षण करण्यासाठी पालिकेने विशेष काळजी घेतली आहे.

संवर्धनासाठी विशेष उपाययोजना
वणव्यापासून बचाव : उन्हाळ्यात लागणाऱ्या आगीपासून रोपांचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण परिसरात जाळ रेषा आखल्या जातील.
मोकाट जनावरांपासून संरक्षण : रोपे गुराढोरांच्या पायाखाली तुडवली जाऊ नयेत म्हणून विशेष कुंपण व सुरक्षा व्यवस्था असेल.
सिंचन व निगा : वाळलेले गवत आणि वेलताणे काढून जमिनीची निंदणी व भरबांगळन केली जाईल. मजुरांमार्फत रोपांना नियमित पाणी दिले जाईल आणि एखादे रोप सुकल्यास तिथे लगेच नवीन झाड लावले जाईल.

पक्षी, कीटक अन् निसर्गाचा अनोखा अधिवास
हे बांबूचे जंगल फक्त झाडे म्हणूनच उभे राहणार नाही, तर तिथे एक स्वतंत्र इको-सिस्टीम (पारिस्थितिकी तंत्र) निर्माण होईल. या घनदाट बांबूच्या सावलीत विविध जातींचे पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे, लहान-मोठे कीटक आणि सरपटणारे प्राणी यांना सुरक्षित नैसर्गिक घरकुल मिळेल. बांबूची मुळे माती घट्ट धरून ठेवतात, यामुळे धरणाच्या परिसरातील जमिनीची धूप थांबेल आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. वाढते तापमान, हवेतील धूळ आणि ध्वनी प्रदूषण कमी करून हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचे मोठे काम ही ३३ हजार बांबूची झाडे करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com