

उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) : स्वीकृत नगरसेवकपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी, यासाठी उल्हासनगरातील इच्छुकांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. गणपती दर्शन, वाढदिवस आणि अन्य निमित्तांनी वरिष्ठ नेत्यांच्या घरांसह कार्यालयांमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आहे. सात जागांसाठी दावेदारांची संख्या अधिक असल्याने निष्ठावंत की वजनदार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
उल्हासनगर महापालिकेतील सात स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच भाजप आणि शिवसेनेतील इच्छुकांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी, यासाठी अनेकांनी वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. गणपती दर्शन, वाढदिवसाचे औचित्य तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नेत्यांची भेट घेत इच्छुकांकडून आपल्या नावाचा आग्रह धरला जात आहे. पक्षनिष्ठा, सामाजिक कार्य, राजकीय अनुभव आणि समाजातील प्रतिनिधित्वाचा दाखला देत प्रत्येक जण आपली दावेदारी भक्कम असल्याचे पटवून देत आहे.
काही इच्छुकांनी स्थानिक पदाधिकारी आणि प्रभावशाली नेत्यांच्या माध्यमातून पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत शिफारशी पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. संख्याबळानुसार सातपैकी चार जागा भाजपच्या, तर तीन जागा शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे.
नेतृत्वाचा कस लागणार
उपलब्ध जागांच्या तुलनेत दावेदारांची संख्या अधिक असल्याने अंतिम नावे निश्चित करताना दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. यापूर्वी उमेदवारांच्या नावांवर एकमत न झाल्यामुळे निवडणूक स्थगित झाल्याची चर्चा होती. त्यामुळे या वेळी कोणताही नवा वाद उद्भवू नये, यासाठी नेतृत्वाकडून सावध पावले उचलली जात आहेत.
राजकीय वर्तुळाचे लक्ष
अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंतांना संधी मिळणार की वरिष्ठांशी जवळीक आणि राजकीय वजन असलेले दावेदार बाजी मारणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अंतिम यादीत स्थान न मिळालेल्या इच्छुकांची नाराजी युतीसाठी नवी डोकेदुखी ठरण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.