खरातनंतर १०० हून अधिक भोंदू बाबांविरोधात गुन्हे

खरातनंतर १०० हून अधिक भोंदू बाबांविरोधात गुन्हे
Published on

कल्याण, ता. २० (वार्ताहर) : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत. या कालावधीत राज्यभरात १०० हून अधिक भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल झाल्याचा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) केला आहे. या प्रकरणांमध्ये महिलांचे शारीरिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल केल्याच्या घटना समोर आल्याचे समितीने म्हटले आहे. नाशिक आणि पुणे जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे नोंदविले गेल्याची माहितीही देण्यात आली आहे.

अशोक खरात प्रकरणानंतर अंनिसने राज्यभर ‘बुवाबाजी संघर्ष परिषदां’चे आयोजन केले आहे. या माध्यमातून भोंदूगिरीविरोधात जनजागृती करण्यात आली, तसेच पीडितांना पुढे येण्यासाठी पाठबळ देण्यात आले. काही ठिकाणी पीडितांनी स्वतःहून, तर काही ठिकाणी ‘अंनिस’च्या प्रयत्नांनंतर गुन्हे दाखल झाल्याचे समितीने म्हटले आहे. भीती आणि सामाजिक प्रतिष्ठेमुळे अनेक पीडित तक्रार करण्यास पुढे येत नव्हते. खरात प्रकरणानंतर पीडितांना आवाज उठविण्याचे बळ मिळाले, असा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ‘अंनिस’चे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुषमा बसवंत, प्रधान सचिव राजेश देवरुखकर, रमेश वनारसे, किरण इशी, अनिल ठाणेकर, हनुमंत देडगे आणि दिवेंद्र मोरे यांनी ही माहिती दिली.

संघटनेमुळे अन्यायाला वाच्यता
भोंदूंकडून करणी-भानामती काढणे, भूत उतरवणे, अघोरी पूजा करणे, कौटुंबिक व आर्थिक समस्या दूर करण्याचे आश्वासन, आजार बरे करण्याचे दावे तसेच ‘पैशांचा पाऊस पाडण्याचे’ प्रलोभन दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याच्या घटना समोर आल्याचे ‘अंनिस’ने म्हटले आहे. विशेषतः महिलांच्या शारीरिक शोषणासोबत आर्थिक लुटीचे प्रमाणही असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दक्षता अधिकाऱ्याची गरज
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली अंधश्रद्धेविरोधात झालेल्या दीर्घ संघर्षानंतर महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम, २०१३’ अस्तित्वात आला; मात्र या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियमांची आवश्यकता असून प्रत्येक पोलिस ठाण्यात दक्षता अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी ‘अंनिस’ने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com